ब्रेक्झिटनंतर ब्रिटन भारताबरोबर सर्वात मोठा व्यापारी करार करीत आहे

- ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

व्यापारी करारलंडन – भारताबरोबरील प्रस्तावित मुक्त व्यापारी करार हा ब्रिटनकडून ‘ब्रेक्झिट’नंतर करण्यात येणारा सर्वात मोठा व्यापारी करार असल्याचा दावा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केला. भारत-ब्रिटन करारासाठी दिवाळीची मुदत असून त्याच्या आत हा करार पार पडेल, असा विश्वासही पंतप्रधान जॉन्सन यांनी व्यक्त केला. कॉमनवेल्थ देशांच्या प्रमुखांच्या बैठकीत ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केलेली ही विधाने ब्रिटन भारताबरोबरील व्यापारी संबंधांना फार मोठे महत्त्व देत असल्याचे दाखवून देत आहे.

कॉमनवेल्थ अर्थात राष्ट्रकूल देश हे ब्रिटनपासून स्वतंत्र झालेले आहेत. कॉमनवेल्थचे 54 सदस्यदेश असून याच्या बैठकीला संबोधित करताना ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारताचे महत्त्व अधोरेखित केले. भारत हा कॉमनवेल्थमधील सर्वात मोठा देश ठरतो. म्हणूनच भारताबरोबरील ब्रिटनचा मुक्त व्यापारी करार हा सर्वात महत्त्वाचा व मोठा ठरतो. ब्रेक्झिटनंतर ब्रिटन भारताबरोबर करीत असलेला हा सर्वात मोठा मुक्त व्यापारी करार आहे, असे पंतप्रधान जॉन्सन पुढे म्हणाले.

दिवाळीपर्यंत हा करार पूर्णत्त्वास जाईल, असा विश्वास पंतप्रधान जॉन्सन यांनी व्यक्त केला. एकाच वेळी ब्रेक्झिटनंतर होत असलेला ब्रिटनचा सर्वात मोठा करार, दिवाळीच्या आधी पूर्ण होईल, हे ब्रिटनच्या पंतप्रधानांचे शब्द सदर कराराचे भारत व ब्रिटनसाठीही असलेले महत्त्व स्पष्ट करीत आहे. युरोपिय महासंघाबरोबर झालेल्या तीव्र मतभेदांमुळे ब्रिटनने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. याचा फटका ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला बसले, असे इशारे त्यावेळी युरोपिय महासंघाने दिले होते. मात्र भारत व चीन या देशांबरोबर आर्थिक सहकार्य वाढवून ब्रिटन महासंघातून बाहेर पडल्याने होणारे नुकसान भरून काढेल, असे दावे त्यावेळी काहीजणांनी केले होते.

त्यानंतर ब्रेक्झिटनंतरच्या काळात ब्रिटनने भारताबरोबरील आपले द्विपक्षीय सहकार्य अधिकच दृढ करण्याचा धोरणात्मक निर्णयघेतला होता. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. भारताकडूनही त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळाल्याचे दिसत होते. मात्र ब्रिटन व त्यानंतर भारतात आलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे दोन्ही देशांमधील द्विक्षपक्षीय सहकार्य काही काळासाठी लांबणीवर पडले. पण मुक्त व्यापारी करारावरील चर्चेला वेग देऊन दोन्ही देशांनी या वर्षाच्या दिवाळीच्या आधी मुक्त व्यापारी करार पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन सातत्याने सदर करार दिवाळीच्या आधीच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करीत आहेत. दरम्यान, ब्रिटनच्या व्यापार विभागाने दिलेल्या माहितीनुसार उभय देशांमधील वार्षिक द्विपक्षीय व्यापार सुमारे 24 अब्ज पौंड इतका आहे. मुक्त व्यापारी करार झाल्यानंतर, 2030 सालापर्यंत हा द्विपक्षीय व्यापार 50 अब्ज पौंडावर नेण्याचे ध्येय दोन्ही देशांनी समोर ठेवलेले आहे.

leave a reply