इथिओपियातील वांशिक हत्याकांडात दोनशेहून अधिक जणांचा बळी

- ‘ओरोमो लिबरेशन आर्मी'चा हात असल्याचा दावा

वांशिक हत्याकांडातआदिस अबाबा – इथिओपियाच्या ओरोमिआ प्रांतात झालेल्या वांशिक हत्याकांडात दोनशेहून अधिक जणांचा बळी गेल्याची भयंकर बाब समोर आली आहे. गेल्या आठवड्यात ओरोमिया प्रांतातील टोले भागातील संघर्षात हे बळी गेले. बळी जाणाऱ्यांमध्ये अम्हारा वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे. इथिओपिया सरकारने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या ‘ओरोमो लिबरेशन आर्मी’ या गटाने हे भीषण हत्याकांड घडविल्याचे सांगण्यात येते. मात्र या गटाने आपल्यावरील आरोप फेटाळले असून सरकार व समर्थक सशस्त्र गटांनी हल्ले चढविल्याचा दावा केला आहे. गेल्या वर्षभरात ओरोमिया प्रांतात घडलेले हे दुसरे मोठे हत्याकांड ठरते.

ओरोमिया प्रांतातील स्थानिक प्रशासन तसेच प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीतून हत्याकांडाची घटना समोर आली. त्यानुसार शनिवारी हे हत्याकांड घडविण्यात आल्याचे सांगण्यात येते. प्रशासन व प्रत्यक्षदर्शींनी ‘ओरोमो लिबरेशन आर्मी’ने टोले भागात हल्ले चढवून घरांची जाळपोळ करीत हत्याकांड घडविल्याचा दावा केला आहे. ओरोमिया प्रांतात इथिओपिया सरकारने बंडखोर व दहशतवादी गटांविरोधात मोहीम उघडली आहे. या मोहिमेविरोधात सूड उगविण्यासाठी ‘ओरोमो लिबरेशन आर्मी’ने हत्याकांड घडविल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वांशिक हत्याकांडातसदर हत्याकांडात 100हून अधिक जणांचा बळी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण प्रत्यक्षदर्शींनी जवळपास 230 जणांचा बळी गेल्याचे दावे केले आहेत. काहींनी 300 जण ठार झाल्याचे म्हटले असले तरी त्याला दुजोरा मिळालेला नाही. इथिओपियाचे पंतप्रधान अबि अहमद यांनी हत्याकांडाचा निषेध केला आहे. निष्पाप नागरिकांवरील क्रूर हल्ले निंदनीय व अस्वीकारार्ह आहेत, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान अहमद यांनी दिली.

वांशिक हत्याकांडातया हत्याकांडावरून ‘ओरोमो लिबरेशन आर्मी’वर आरोप होत असलेले तरी सदर गटाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याविरोधात कारवाई करणाऱ्या इथिओपियन लष्कर व सरकार समर्थक सशस्त्र गटांनी हल्ले चढविल्याचा दावा ‘ओरोमो लिबरेशन आर्मी’च्या प्रवक्त्यांनी केला. इथिओपियात गेल्या वर्षभरात झालेले हे दुसरे मोठे हत्याकांड ठरले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ‘ओरोमो लिबरेशन आर्मी’ने ‘ईस्ट वोलेगा झोन’मधील किरामु डिस्ट्रिक्टमध्ये भीषण हल्ला चढविला होता. त्यातही 200हून अधिक जणांचा बळी गेला होता.

चार वर्षांपूर्वी इथिओपियाची सूत्रे स्वीकारलेल्या अबि अहमद यांनी वांशिक संघर्षावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात इथिओपियात नव्याने वांशिक संघर्षाचा भडका उडत असल्याचे दिसू लागले आहे.

leave a reply