अफगाणिस्तानातील रक्तपात रोखण्यासाठी भारताचे आवाहन

मॉस्को – अफगाणिस्तानातील हिंसाचारावर गंभीर चिंता व्यक्त करून भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्वरित हा रक्तपात थांबविण्याचे आवाहन केले आहे. तालिबान अफगाणिस्तानच्या अधिकाधिक भूमीचा ताबा घेत असताना, भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या देशावर राज्य करण्याच्या वैध अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्याबरोबरील चर्चेनंतर आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत परराष्ट्रमंत्री जयशंकर बोलत होते.

अफगाणिस्तानातील रक्तपात रोखण्यासाठी भारताचे आवाहनभारताचे परराष्ट्रमंत्री रशियाच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. अफगाणिस्तानातील घडामोडींवर चर्चा हा परराष्ट्रमंत्र्यांच्या रशिया भेटीमागील प्रमुख मुद्दा असल्याचे सांगितले जाते. अफगाणिस्तानात तालिबानची लष्करी आगेकूच सुरू झाली असून अफगाणी लष्कराला तालिबानचा मुकाबला करणे अवघड बनल्याच्या बातम्या येत आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीचा वेग वाढविला असून त्याच प्रमाणात तालिबानची आक्रमकता वाढत चालली आहे. तालिबानला अफगाणिस्तानचा पूर्ण ताबा घेण्यात यश मिळाले, तर त्याचे विपरित परिणाम होतील, असे सर्वच शेजारी देशांना वाटू लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर अफगाणिस्तानातील परिस्थितीचा संपूर्ण क्षेत्राच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्याचा दावा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केला.

रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्याबरोबरीने अफगाणिस्तानातील परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या देशातील रक्तपात त्वरित थांबविण्याचे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानात व अफगाणिस्तानच्या सभोवती शांतता प्रस्थापित झाल्याखेरीज या देशाची समस्या सुटणार नाही. हिंसेने अफगाणिस्तानचा प्रश्‍न अजिबात सुटू शकत नाही, असे सांगून जयशंकर यांनी राजकीय वाटाघाटींसाठी आग्रह धरला. याबरोबरच अफगाणिस्तानात राज्य करण्याच्या वैध अधिकारांचा मुद्दा उपस्थित करून जयशंकर यांनी तालिबानला बळाचा वापर करून अफगाणिस्तानवर राज्य करता येणार नाही, याची जाणीव करून दिली.

दरम्यान, भारताने आपली आधीची भूमिका काही प्रमाणात मवाळ करून तालिबानशी चर्चा सुरू केल्याचे दावे समोर येत आहेत. अधिकृत पातळीवर भारत व तालिबाननेही याला दुजोरा दिलेला नाही. पण आत्तापर्यंत अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास व दूतावासातील कर्मचार्‍यांवर तालिबानने हल्ला चढविलेला नाही. ही बाब लक्षणीय असून तालिबान याद्वारे भारताला आश्‍वस्त करीत असल्याचे दावे विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply