चीनबरोबरच पाकिस्तान आणि नेपाळच्या सीमेवरुनही भारताला घेरता येईल

- चीनच्या सरकारी मुखपत्राची धमकी

India-Chinaबीजिंग – आपले लष्करी सामर्थ्य भारतापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे दावे करणारा चीन भारतावर पाकिस्तान आणि नेपाळच्या सीमेवरुनही दडपण टाकायची भाषा करु लागला आहे. चीनबरोबरील सीमेवर संघर्ष उद्भभवला तर भारताला चीनचे घनिष्ठ सहकारी असणाऱ्या पाकिस्तान आणि नेपाळकडून हल्ल्यांचा सामना करावा लागेल आणि एकाचवेळी तीन आघाड्यांवर लढण्याची क्षमता भारताकडे नाही, असा दावा चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने केला आहे. त्याचवेळी अमेरिकेने दिलेल्या चिथावणीमुळे भारत चीनविरोधी कारवाया करीत आहे व सीमावाद सुरु झाल्यावर चिनी मालावर बहिष्कारासारख्या मोहिमा भारतीयांनी थांबवायला हव्या, असे सल्ले देखील ग्लोबल टाईम्सने दिले आहेत. गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे २० सैनिक शहीद झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. त्याची झळ चीनलाही जाणवू लागली आहे. म्हणूनच वारंवार भारताला इशारे व धमक्या देणाऱ्या चीनच्या मुखपत्राने यावेळी भारताला नवनवीन धमक्या देण्याचे सत्र सुरु ठेवले आहे. एकीकडे चीनचे लष्करी सामर्थ्य भारतापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे दावे ग्लोबल टाइम्सने आपल्या संपादकीय लेखात केले आहे. तर पुढच्या बाजूला पाकिस्तान आणि नेपाळसारख्या छोट्या देशांचा वापर करुन भारताला जेरीस आणता येईल, अशी धमकी ग्लोबल टाईम्सच्या संपादकीय लेखात देण्यात आली आहे. तसेच चीनने गलवान व्हॅलीमध्ये बळी गेलेल्या आपल्या जवानांची संख्या दडवली, याचे कारण चीनला आपल्या देशातील जनतेच्या भावना पेटवून वाद वाढवायचा नाही हे आहे, अशी उद्दात भूमिका ग्लोबल टाईम्सने घेतली आहे. वेगळ्या शब्दात कर्नलच्या हुद्यावरील आपल्या अधिकांऱ्यासह २० सैनिक गमावणाऱ्या भारताने चीनच्या सामर्थ्याच्या धाकात राहून ही गोष्ट विसरून जावी आणि गलवान व्हॅली चीनसाठी सोडून द्यावी, असे ग्लोबल टाईम्स सुचवित आहे. त्याचबरोबर भारताने सीमावाद पेटल्यानंतर चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची भाषा करु नये, असा सल्लाही ग्लोबल टाईम्सने दिला आहे. दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी तसेच परराष्ट्रमंत्री सीमावाद शांततेने सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. याकडे लक्ष वेधून चीनलाही भारताबरोबर संघर्ष अपेक्षित नसल्याचे या संपादकीय लेखात नमूद करण्यात आले आहे. मात्र चीनच्या संयमाला कमकुवतपणा मानू नका, असा इशारा या लेखात देण्यात आला आहे.

लडाखमध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्यापासून ग्लोबल टाईम्स सातत्याने भारताच्या विरोधात गरळ ओकत आहे. तसेच आपल्या या मुखपत्राचा वापर करुन चीनची कम्युनिस्ट राजवट भारताला इशारे व धमक्या देत आहेत. पण आता भारतीयांचा संताप अनावर झाल्यानंतर तिन्ही बाजूने भारताला घेरण्याची धमकी देऊन चीनची राजवट भारतावरील दबाव वाढवू पाहत आहे. मात्र चीनचे डावपेच, व्यूहरचना याची पूर्ण कल्पना असलेल्या भारतीय संरक्षण दलांनी या देशाचे सारे डाव हाणून पाडल्याची जोरदार तयारी केलेली आहे. इतकेच नाही तर भारताच्या सरकारने देखील चिनी लष्कराच्या कारवायांना उत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्या सेनादलाला दिलेले आहे. यामुळे पुढच्या काळात चीनच्या सीमेवर झटापट होणार नाही तर चीनला गोळीने उत्तर मिळेल, असे सांगून भारताचे माजी लष्करी त्यावर समाधान व्यक्त करीत आहेत. जोवर चीनला दणका मिळत नाही तोपर्यत हा देश भारताच्या संयमाची अशीच परीक्षा घेत राहील, असे स्पष्ट संकेत ग्लोबल टाईम्समधील या संपादकीय लेखातून मिळत आहे.

leave a reply