भारत कोरोनाच्या ५०० कोटी लसींचे डोस तयार करू शकतो

- परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला

नवी दिल्ली – भारत अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘ग्लोबल ऍक्शन प्लॅन’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यास तयार आहे. जगभरातील अनेक भागात महासाथीचा सामना करण्यासाठी आवश्यक गोष्टींचा भारत पुरवठा करू शकतो. भारताने वर्षाअखेरीपर्यंत लसीचे ५०० कोटी डोस उत्पादन करण्याची क्षमता मिळविली आहे, असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी अधोरेखित केले. अमेरिकेने कोराना महासाथीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत परराष्ट्र सचिव श्रिंगला सहभागी झाले होते. बैठकीला विविध देशांचे परराष्ट्रमंत्री आणि उच्चाधिकारी उपस्थित होते.

भारत कोरोनाच्या ५०० कोटी लसींचे डोस तयार करू शकतो - परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगलाया बैठकीत भारत कोरोनाविरोधी लढाईत फार मोठी भूमिका निभावण्यास सज्ज असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. सध्याच्या घडीला भारत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मान्यता दिलेल्या चार कोरोना लसींचे उत्पादन घेत आहे. यामध्ये कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड, कोवोव्हॅक्स आणि जॉन्सन या लसींचा समावेश आहे. याशिवाय कोर्बोव्हॅक्स, झाककोव्ह-डी आणि जेनोव्हा या तीन लसी डब्ल्यूएचओच्या मंजुरीची वाट पाहत आहेत.

महासाथीशी सामना करताना भारत दोन मार्गाने जगाला मदत करू शकतो. पुरवठा साखळी मजबूत आणि सुरक्षित करणे हा पहिला मार्ग आहे. मात्र यासाठी लसींसाठी आवश्यक घटकांच्या ‘ट्रेड रिलेटेड एस्पेक्ट ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट’मध्ये (ट्रिप्स) पेटंटशी निगडीत सूट द्यावी लागेल. यामुळे क्षेत्रिय बाजारात स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी उत्पादन करता येईल, असे परराष्ट्र सचिव श्रिंगला यांनी स्पष्ट केले.

कोरोना विरोधातील लढाई व्यापक करण्यासाठी आणि गरीब देशांपर्यंत लसी पोहोचविण्यासाठी लसींसाठी लागणारी विविध कच्च्या मालाला बुद्धिसंपदा कायद्यातून तात्पूरते मुक्त करावे अशी मागणी भारताने काही महिन्यांपूर्वी केली होती. जागतिक व्यापार परिषदेकडे (डब्ल्यूटीओ) हा मुद्दा उपस्थित केला होता. भारताच्या या मागणीला कित्येक विकसनशील देशांनी साथ दिली होती. भारताच्या मागणीचे होत असलेले स्वागत बघता अमेरिकेलाही तशीच भूमिका स्वीकारावी लागली होती. या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्र सचिव श्रिंगला यांनी पुन्हा एकदा या बैठकीदरम्यान अमेरिकेसह बैठकीला उपस्थित विकसित देशांना या मागणीची एकप्रकारे आठवण करून दिली.

क्षमतांचा विस्तार करून आणि फ्रन्टलाईन व आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देऊन भारत दुसर्‍या मार्गाने कोरोनासाथीविरोधातील लढाईत सहाय्य करू शकतो, ही बाबही परराष्ट्रसचिव श्रिंगला यांनी मांडली. आशिया, अफ्रिका, लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये भारत तेथील आरोग्य कर्मचार्‍यांना प्रक्षिणत देऊ शकेल. आतापर्यंत भारताने ६० देशांमध्ये अशाप्रकारे प्रशिक्षण दिले आहे, असे श्रिंगला यांनी यावेळी सांगितले.

leave a reply