सीमावाद भारत-चीनमधील सहकार्याच्या आड येता कामा नये

- चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची मागणी

India-China-cooperationबीजिंग – भारत आणि चीन यांच्यात सहकार्य प्रस्थापित झाल्याखेरीज हे शतक आशियाचे शतक म्हणून ओळखले जाऊ शकत नाही, असे भारताचे परराष्ट्रमंत्री नुकतेच म्हणाले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही त्याला दुजोरा दिलेला आहे. पण दोन्ही देशांमध्ये हे सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी भारताने चीन करीत असलेल्या दिशेनेच प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी बजावले आहे. चीनचे विश्लेषक देखील भारत व चीनमधील सीमावाद दोन्ही देशांच्या सहकार्यामधील अडसर बनता कामा नये, असे आवाहन करीत आहेत. त्याचवेळी सीमावाद सोडविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न प्रभावी ठरत असल्याची नोंद देखील चीनकडून केली जात आहे.

थायलंडच्या एका विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारत व चीनमध्ये सहकार्य प्रस्थापित झाल्याखेरीज २१ वे शतक आशियाचे शतक म्हणून ओळखले जाऊ शकत नाही, असे विधान केले होते. त्याचवेळी भारत व चीनचे संबंध ताणलेले आहेत, हे देखील जयशंकर यांनी स्पष्ट शब्दात बजावले होते. याला चीनच्या विस्तारवादी कारवाया जबाबदार असल्याचे सांगून भारताच्या सीमेवर चीनच्या विस्तारवादाचे प्रयोग थांबल्याखेरीज दोन्ही देशांमध्ये शांतता व सौहार्द प्रस्थापित होणार नाही, याचीही जाणीव जयशंकर यांनी नेमक्या शब्दात आपल्या या व्याख्यानात करून दिली होती.

Chinese Foreign Ministry मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जयशंकर यांच्या व्याख्यानातील काही विधाने निवडून त्यावर सहमती व्यक्त केली आहे. भारत व चीन प्राचीन सभ्यता असलेले देश असून दोन्ही मोठे देश आर्थिकदृष्ट्याही प्रभावशाली आहेत. त्यामुळे आशिया किंवा आशिया-पॅसिफिकच्या विकासासाठी भारत व चीनचे एकत्र येणे अत्यावश्यक ठरते, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी केला. त्यासाठी चीन करीत असलेल्या प्रयत्नांच्या दिशेनेच भारताने प्रयत्न करायला हवेत, असे वेनबिन यांनी म्हटले आहे. वेगळ्या शब्दात चीनला मान्य असलेली भूमिकाच भारताने स्वीकारावी, असे वेनबिन सुचवित आहेत.

जयशंकर यांच्या काही विधानांचे चीनच्या माध्यमांमध्येही स्वागत होत असून चिनी विश्लेषक भारत व चीनच्या सहकार्याची आवश्यकता मान्य करीत आहेत. त्याचवेळी दोन्ही देशांमधला सीमावाद हा या सहकार्याच्या आड येता कामा नये, अशी अपेक्षाही चीनचे विश्लेषक व्यक्त करीत आहेत. मात्र भारताने यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतली असून दोन्ही देशांच्या सीमेवर पन्नास ते साठ हजार सैनिक एकमेकांच्या समोर खडे ठाकलेले असताना, सहकार्य प्रस्थापित होऊ शकत नाही. सीमेवर सौहार्द कायम ठेवणे ही द्विपक्षीय सहकार्याची पूर्वअट असते, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनला करून दिली होती. नेमका हाच मुद्दा चीन दुर्लक्षित करीत आहे.

leave a reply