भारत आशियाच्या गुरुत्त्वीय शक्तीचे केंद्र आहे

- जपानचे उपसंरक्षणमंत्री नाकायामा

नवी दिल्ली – “भारत हे आशिया खंडाच्या गुरुत्त्वीय शक्तीचे केंद्र आहे. चीनच्या धोका बळावत असताना, भारताने अमेरिका-ऑस्ट्रेलिया व जपानचा समावेश असलेल्या ‘क्वाड’साठी अधिक प्रतिबद्धता दाखवावी”, असे आवाहन जपानचे उपसंरक्षणमंत्री यासुहिदे नाकायामा यांनी केले आहे. त्याचवेळी कोरोनाव्हायरसचा उगम झालेल्या चीनने तसेच जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत जगाला विस्ताराने माहिती देण्याची गरज असल्याचे सांगून उपसंरक्षणमंत्री नाकायामा यांनी चीनची यासंदर्भातील भूमिका संशयास्पद असल्याचे संकेत दिले आहेत.

‘आम्हाला सामर्थ्यशाली भारत हवा आहे. भारत हा आशिया खंडाच्या गुरुत्त्वीय शक्तीचे केंद्र असून अत्यंत महत्त्वाचा देश आहे. क्वाडसंदर्भातील भारताच्या भूमिकेची मला माहिती आहे. म्हणूनच मी भारताने मुक्त व खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेसाठी अधिक प्रतिबद्धता दाखवावी, असे आवाहन करीत आहे’, असे जपानचे उपसंरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. एका भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपसंरक्षणमंत्री नाकायामा यांनी हे आवाहन करीत असताना, चीनच्या धोक्याचा स्पष्टपणे उल्लेख केला. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये वाढलेल्या तणावावर बोलतानाही, नाकायामा यांनी आपल्याला चीनच्या आक्रमक व विस्तारवादी धोरणांची कल्पना असल्याचे स्पष्ट केले.

चीनच्या आक्रमक लष्करी कारवाया खपवून घेणे अत्यंत अवघड आहे, याचा अनुभव जपान घेत आहे. त्यामुळे लडाखच्या एलएसीवरील भारताच्या चिंता जपान जाणू शकतो. मात्र इथला वाद चिघळू नये, दोन्ही देशांनी सामोपचाराने हा प्रश्‍न सोडवावा, असे जपानला वाटत असल्याचे उपसंरक्षणमंत्री नाकायामा पुढे म्हणाले. याबरोबरच करोनाच्या साथीबाबत बोलताना जपानच्या उपसंरक्षणमंत्र्यांनी चीनच्या यासंदर्भातील भूमिकेवर संशय व्यक्त केला. जिथून या साथीचा उगम झालेला आहे, त्या चीनने तसेच जागतिक आरोग्य संघटनेने या साथीबद्दल जगाला अधिक तपशील पुरविण्याची गरज आहे, असा टोला नाकायामा यांनी लगावला. सध्या चीन तसेच जागतिक आरोग्य संघटना ही अपेक्षा पूर्ण करीत नसल्याचे संकेत नाकायामा यांच्या विधानातून मिळत आहेत.

दरम्यान, जपानने भारताबरोबरील सर्वच पातळ्यांवरील सहकार्य दृढ करण्यासाठी वेगाने पावले उचलण्याची सुरूवात केली आहे. दोन्ही देशांमध्ये नुकताच पोलाद उद्योगसंदर्भात महत्त्वाचा करार संपन्न झाला आहे. यामुळे भारताचे उत्पादन क्षेत्र अधिक विकसित होईल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो. तसेच भारतातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी व जागतिक पुरवठा साखळीत भारताला महत्त्वाचे स्थान मिळावे, यासाठी जपानने सहाय्य करण्याचे मान्य केले आहे. या आघाडीवरील चीनची मक्तेदारी संपविण्यासाठी जपान उत्सुक असून या संदर्भातील भारत व जपानमधील सहकार्य मोलाचे ठरत आहे.

leave a reply