चीनकडून पाकिस्तानला 50 हल्लेखोर ड्रोन्सचा पुरवठा

नवी दिल्ली – भारताच्या विरोधात पाकिस्तानला शस्त्रसज्ज करणाऱ्या चीनने नुकतेच 50 ‘विंग लूंग 2’ या हल्लेखोर ड्रोन्सनी पाकिस्तानला सज्ज केले आहे. आपले हे ड्रोन्स भारतासाठी दु:स्वप्न ठरतील, असा दावा चीनच्या मुखपत्राने केला होता. पण चीनच्या या ड्रोन्सनी जम्मू-काश्‍मीरची ‘एलओसी’ किंवा लडाखची ‘एलएसी’ पार केली तर ते सहजरित्या लक्ष्य केले जातील, असा दावा भारताच्या माजी वायुसेनाप्रमुखांनी केला आहे.

दोन वर्षांपूर्वी चीनने पाकिस्तानला ‘विंग लूंग 2’ ड्रोन्स पुरविण्याची घोषणा केली होती. अमेरिकेच्या रिपर ड्रोन्सची नक्कल असलेले या ड्रोन्सबाबत चिनी माध्यमांनी मोठमोठे दावे केले आहेत. लढाऊ विमानांच्या एक दशांश खर्चात तयार होणारे आपले ड्रोन्स दिर्घ पल्ल्याचे अंतर गाठून अचूकपणे लक्ष्य भेदतात, असा दावा चिनी माध्यमांनी केला होता. लिबिया, नायजेरिया या आफ्रिकी देशांनी चीनकडून या ड्रोन्सची खरेदी केली होती. काही महिन्यांपूर्वी लिबियामध्ये पेटलेल्या गृहयुद्धात तुर्कीच्या लष्कराने चीनचे ड्रोन पाडल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.

असे हे ड्रोन्स भारतासाठी दु:स्वप्न ठरतील, असा दावा चीनच्या मुखपत्राने काही दिवसांपूर्वी केला होता. कारण आपल्या या प्रगत ड्रोन्सना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या लष्कराची क्षमता नाही. भारताचे लष्कर आपल्या ड्रोन्सचे हल्ले चुकवू शकणार नाहीत, असे चिनी मुखपत्राचे म्हणणे आहे. पण भारताच्या माजी वायुसेनाप्रमुखांनी चिनी मुखपत्राच्या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे. भारताच्या रडार यंत्रणा ‘एलओसी’ किंवा ‘एलएसी’च्या हवाई क्षेत्रातील हालचालींवर बारकाईने नजर ठेवून आहेत. ‘एलओसी’ किंवा ‘एलएसी’ ओलांडून शत्रूचे ड्रोन्स भारताच्या हवाई क्षेत्रात घुसल्यास त्यांना तिथेच नष्ट केले जाईल, असा इशारा माजी वायुसेनाप्रमुखांनी दिला.

leave a reply