एलएसीवर तणाव कायम ठेवून भारत-चीन संबंध सुधारणार नाहीत

- परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची चीनला समज

नवी दिल्ली – ‘मागची ४० वर्षे भारत आणि चीनच्या सीमेवर शांतता व सौहार्द कायम राहिले होते. मात्र गेल्या वर्षी ही परिस्थिती बदलली. कुठलीही चिथावणी मिळाल्याखेरीज चीनने भारताच्या सीमेजवळ प्रचंड प्रमाणात लष्करी तैनाती केली. सीमेवर तणाव माजवून द्विपक्षीय संबंध सुरळीत राहतील, अशी अपेक्षा कुणालाही ठेवता येणार नाही’, अशा शब्दात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला पुन्हा एकदा समज दिली आहे. तर भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्री यांनी सीमेवर शांतता व सौहार्द राखण्यावर दोन्ही देशांच्या नेत्यांची सहमती झाली होती, याची आठवण चीनला करून दिली. या सहमतीकडे पाठ फिरवून सीमेवरील चीनच्या कारवाया छोटी बाब म्हणून दुर्लक्षित करता येऊ शकत नाही, असे राजदूत मिस्री यांनी बजावले आहे.

लडाखच्या एलएसीवरील गोग्रा, हॉट स्प्रिंग आणि डेप्सांग इथून अजूनही चीनने माघार घेतलेली नाही. आत्तापर्यंत लडाखच्या एलएसीवरील वाद सोडविण्याबाबत झालेल्या प्रगतीवर भारताने समाधान व्यक्त करावे, असे चीनकडून सांगितले जात आहे. यानंतर भारत चीनला वारंवार परिणामांची जाणीव करून देत आहे. गेल्या आठवड्यात नवी दिल्लीतील रासयेना डायलॉगमध्ये बोलताना संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी चीनला खरमरीत इशारा दिला होता. आपले लष्कर सामर्थशाली आहे या भ्रमात राहून चीनने भारताला धक्का देण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण भारतीय लष्कराच्या निर्धारामुळे चीनला एलएसीवर एकतर्फी बदल करता आले नाहीत, असे जनरल रावत यांनी म्हटले होते. त्याचवेळी चीनबरोबरच्या एलएसीवरील या वादात आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या मागे आहे, याकडेही जनरल रावत यांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्री यांनी चीनला पुन्हा एकदा परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.

‘गेल्या ४० वर्षांपासून भारत आणि चीनच्या सीमेवर शांतता व सौहार्द कायम राहिले होते. याचा लाभ दोन्ही देशांच्या संबंधांना झाला आणि हे संबंध विकसित झाले. याचा अर्थ दोन्ही देशांमधील सीमावाद सुटला असा होत नाही. पण या सीमावादाचा परिणाम भारत आणि चीनच्या संबंधांवर झालेला नव्हता. पण गेल्या वर्षापासून ही परिस्थिती बदलली. चीनने कुठलेही कारण नसताना लडाखच्या एलएसीवर प्रचंड प्रमाणात लष्करी तैनाती केली. सीमेवर तणाव माजवून तुम्हाला द्विपक्षीय संबंध सुरळीत राखता येऊ शकत नाही, हे उघड आहे. म्हणूनच भारत व चीनचे द्विपक्षीय संबंध सहकार्य कायम रहावे यासाठी सीमेवर शांतता व सौहार्द आवश्यक आहे, असे मी वारंवार सांगत आलो. आत्ताही या भूमिकेत बदल झालेला नाही’, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी यासंदर्भातील भारताची भूमिका ठामपणे मांडली.

‘इंडियन काऊन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स’ (आसीडब्ल्यूए) आणि चीनच्या पिपल्स इन्स्टीट्युट ऑफ फॉरिन अफेअर्स’ (सीपीआयएफए) यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजदूत विक्रम मिस्री यांनीही सीमावादाबाबत चीनला खडे बोल सुनावले. भारत आणि चीनच्या सीमेवरील घटनांकडे छोटी बाब म्हणून अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये सीमेवर शांतता व सौहार्द कायम राखण्यावर सहमती झाली होती. त्याकडे दोन्ही देशांना दुर्लक्ष करता येणार नाही, असे मिस्री यांनी बजावले. चीनच्या एलएसीवरील कारवाया दोन्ही देशांच्या सहकार्यासाठी उपकारक ठरणार्‍या नाहीत, उलट यामुळे परस्परांवरील विश्‍वास नष्ट होईल, असा इशारा राजदूत मिस्री यांनी दिला आहे.

leave a reply