भारताने कोरोना लसीकरणाचा ५० कोटींचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत ५० कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. शनिवारी दिवसभरात ४९ लाख ५५ हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लस देण्यात आली. याबरोबर हा ५० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला गेला. पंतप्रधान नरेंेद्र मोदी यांनी यानंतर सोशल माध्यमांमधून संदेश देताना अशाच प्रकारे येत्याकाळात अधिकाधिक लोकांचे लसीकरण होईल, अशी ग्वाही दिली. गेल्या २० दिवसात देशात १० कोटीहून अधिक जणांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

भारताने कोरोना लसीकरणाचा ५० कोटींचा टप्पा ओलांडलासंपूर्ण देशात लसीकरणासाठी सुमारे दोन अब्जाहून अधिक लसींची आवश्यकता आहे. मात्र जानेवारीत लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. त्यावेळी उपलब्ध साधने आणि लसींचे उत्पादन याची क्षमता पाहाता भारताने इतर देशांच्या तुलनेत खूप कमी वेळेत ५० कोटी लसींचे डोस देण्याचा हा टप्पा ओलांडला आहे. मात्र देशाची लोकसंख्या पाहता अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. जानेवारी महिन्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सच्या सहाय्याने लसीकरणाला सुरूवात झाली. आतापर्यंत १ कोटी ३ लाख २९ हजार आरोग्य कर्मचार्‍यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ७९ लाख ५३ हजार आरोग्य सेवकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तेच १ कोटी ८२ लाखांहून अधिक फ्रन्टलाईन्स वर्कर्सना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून १ कोटी १६ लाख ५५ हजाराहून अधिक जणांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

याशिवाय १८ ते ४४ वर्ष वयोगटातील १७ कोटी २६ लाखांहून अधिक जणांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी १२ लाख ८७ हजार जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तेच ४५ ते ५९ वयोगटातील ११ कोटी ८ लाख जणांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तसेच ४ कोटी १९ लाखांहून अधिक जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याशिवाय ६० वर्षांपुढील ७ कोटी ८० लाख ५० हजार जणांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३ कोटी ८१ लाखांहून अधिक जणांना लसीचे दोन्ही डोस लागले आहेत. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली.

देशात पहिल्या १० कोटी जणांचे लसीकरण होण्यासाठी ८५ दिवसांचा वेळ लागला होता. त्यानंतरच १० कोटी डोस ४५ दिवसात देण्यात आले. ३० कोटींचा टप्पा ओलांडण्यासाठी आणखी २९ दिवसांचा कालावधी लागला, तर आणखी १० कोटी डोससह ४० कोटींचा टप्पा पार करण्यासाठी आणखी २४ दिवस लागले. मात्र शेवटचे दहा कोटी डोस हे अवघ्या २० दिवसात देण्यात आले. जुलै महिन्यात १३ कोटी जणांचे लसीकरण पार पडले आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली.

शुक्रवारी चोवीस तासात कोरोना लसीचे ४३ लाख २९ हजार कोरोनाचे डोस देण्यात आले होते, तर शनिवारी चोवीस तासात ४९ लाख ५५ हजार जणांचे लसीकरण झाले. केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत ७५ टक्के लसींची खरेदी करण्यात येत असून या लसी मोफत लसीकरणासाठी राज्यांना पुरविण्यात येतात. तर उर्वरीत २५ टक्के लसी या खाजगी रुग्णालये व संस्थांकडून खरेदी केल्या जातात. सरकारने आतापर्यंत या लसीकरण कार्यक्रमासाठी सुमारे ५२ कोटींहून अधिक कोरोना लसींचा पुरवठा केला आहे. राज्यांकडे अजूनही २ कोटी २९ लाख न वापरलेल्या कोरोना लसींच्या मात्रा शिल्लक आहेत, अशी माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली.

एक डोस असलेल्या ‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’ लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

भारतात कोरोनावरील आणखी एक लस उपलब्ध झाली आहे. शनिवारी ‘द ड्रग्ज् कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) एक डोस असलेल्या ‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’च्या लसीला आपत्कालीन वापरास परवानगी दिली. यामुळे देशात आता पाच लस लसीकरणासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुटनिक, माडर्नासह ‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’चा समावेश आहे. आणखी एक लस भारतात वापरासाठी उपलब्ध झाल्याने कोरोनाविरोधातील लढ्याला आणखी बळ मिळेल, असा विश्‍वास आरोग्यमंत्री मनुसख मंडाविया यांनी व्यक्त केला.

‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’चा एकच डोस असून भारतात उपलब्ध झालेली ही पहिलीच सिंगल डोस लस आहे. दोनच दिवसांपूर्वी ‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’ने भारतात लसीला परवानगी मिळावी यासाठीचा प्रस्तावर केंद्र सरकारकडे पाठविला होता. अमेरिकेत आणि युरोपीय देशात सध्या ‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’ची लस वापरात असून ही लस कोरोनावर ८५ टक्के प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा आहे. दीड महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने नवे लसीकरण धोरण जाहीर करताना संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिलेल्या लसींना जलदगतीने देशात परवानगी देण्याचे धोरण स्वीकारले होते. याअर्ंगतच अवघ्या दोन दिवसात ‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’चा प्रस्ताव स्वीकार करण्यात आला आहे.

leave a reply