‘एआय’मध्ये अमेरिका-चीनला गाठण्यासाठी भारताला संघटित प्रयत्न करावे लागतील

- नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी

मुंबई – ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’च्या (एआय) क्षेत्रात अग्रेसर असलेला देश पुढच्या काळात जगावर वर्चस्व गाजविल, असे दावेकेले जातात. मात्र अमेरिका आणि चीनच्या तुलनेत भारत या क्षेत्रात खूपच मागे पडलेला आहे. एआयच्या क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी भारताला प्रचंड परिश्रम करावे लागतील, याची जाणीव नीति आयोगाचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी करून दिली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया-आयएएमएआय’च्या कार्यक्रमाला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना अमिताभ कांत बोलत होते.

एआय व सुपरकॉम्प्युटिंग या क्षेत्रांमध्ये भारत चीनच्या तुलनेत बराच मागे आहे. या क्षेत्रातील संशोधनासाठी भारताला विशेष प्रयत्न करावे लागतील. या क्षेत्राशी निगडीत असलेल्या प्रत्येकाने यावर विचार करण्याची गरजआहे. त्यासाठी एकत्र येऊन संशोधन तसेच इतर आवश्यक गोष्टींना चालना द्यावी लागेल, असे सांगून अमिताभ कांत यांनी यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे लागतील, याची जाणीव करून दिली. खाजगी क्षेत्रात एआयची प्रगती होत याचा वापर प्रचंड प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे एआय हे काही आता सर्वसामान्यांच्या कक्षेबाहेर असलेले तंत्रज्ञान राहिलेले नाही, याकडे अमिताभ कांत यांनी लक्ष वेधले.

‘एआय’चा सर्वच क्षेत्रात वापर वाढतो आहे. ही बाब लक्षात घेऊन, भारताने या क्षेत्रातील मनुष्यबळ व कौशल्य विकासासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. विशेषतः विद्यार्थ्यांचे एआयमधील कौशल्य विकसित करण्यासाठी, त्याचवेळी व्यावसायिकांना याचे प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न हाती घ्यावे लागतील, असा दावा कांत यांनी केला. अमेरिक व चीन या देशांच्या तुलनेत एआय क्षेत्रात भारत पिछाडीवर असल्याची बाब अमिताभ कांत यांनी लक्षात आणून दिली असून चार दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेला एक अहवाल भारतीयांना वास्तवाची जाणीव करून देणारा ठरतो आहे.

2023 सालापर्यंत भारताची एआय क्षेत्रातील गुंतवणूक अवघे 88 कोटी डॉलर्स इतकी असू शकते, असा दावा या अहवालात करण्यातआला आहे. गेल्या वर्षी जागतिक पातळीवर एआयमधील गुंतवणूक दुपटीने वाढली होती. पण यातील भारताचा हिस्सा दीड टक्के इतकाच आहे. एआय क्षेत्रात आघाडी घ्यायची असेल, तर या क्षेत्रात भारताला प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल, याची जाणीव अमिताभ कांत यांनी वेगळ्या शब्दात करून दिली.

पुढच्या काळात संरक्षणापासून ते दैनंदिन पातळीवरील व्यवहारांपर्यंत प्रत्येक गोष्ट एआयने व्यापलेली असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मानवी जीवनावरील एआयचा प्रभाव कुणालाही टाळता येणार नाही. यामुळे भविष्यात एआयमध्ये अग्रेसर असलेला देश जगावर वर्चस्व गाजविल, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही वर्षांपूर्वी बजावले होते. त्याचा प्रत्यय जगाला येऊ लागला आहे. अशा परिस्थितीत एआयच्या क्षेत्रात चीनसारख्या आपल्या बलाढ्य प्रतिस्पर्धी देशाच्या मागे असणे भारताला परवडणारे नाही. म्हणूनच अमिताभ कांत यांनी यासंदर्भात दिलेला इशारा लक्षवेधी ठरतो.

leave a reply