जपान फिलिपाईन्सबरोबरील संरक्षण सहकार्य वाढविणार

मनिला/टोकिओ – ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर जपानने फिलिपाईन्सबरोबरील संरक्षण सहकार्य अधिक भक्कम करण्याचा निर्णय घेतला आहे. जपानचे हवाईदलप्रमुख शुंझी इझुत्सु यांनी नुकतीच फिलिपाईन्सला भेट दिली. या भेटीत अंतराळ तसेच ‘सर्व्हिलन्स’ तंत्रज्ञानाशी निगडित सहकार्य मजबूत करण्यावर एकमत झाल्याची माहिती जपानी माध्यमांनी दिली. दोन महिन्यांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये ‘टू प्लस टू’ चौकटीत चर्चा पार पडली होती.

चीनच्या ‘साऊथ चायना सी’ व नजिकच्या सागरी क्षेत्रातील विस्तारवादी कारवायांविरोधात जपानने अधिक आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी जपानने आंतरराष्ट्रीय तसेच क्षेत्रिय स्तरावर आघाडी तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही वर्षात जपानने ‘आसियन’ देशांना मोठ्या प्रमाणात संरक्षणसहकार्य पुरवित असून अनेक देशांबरोबर द्विपक्षीय करारही करण्यात आले आहेत. 2015 साली जपान व फिलिपाईन्समध्ये द्विपक्षीय संरक्षण सहकार्य करार झाला होता.

सदर कराराची व्याप्ती वाढविण्यासाठी जपानने पावले उचलली आहेत. एप्रिल महिन्यात झालेली बैठक त्याचाच भाग होता. या बैठकीनंतर दोन देशांच्या संरक्षणदलांमध्ये व्यापक पातळीवर बोलणी सुरू झाली आहेत. जपानचे हवाईदलप्रमुख शुंझी इझुत्सु यांनी दिलेली भेटही त्यातीलच पुढील टप्पा ठरतो. या भेटीत फिलिपिनी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेत अंतराळ व सर्व्हिलन्स तंत्रज्ञानाबाबत प्राधान्याने चर्चा झाली. या भेटीपूर्वी फिलिपाईन्सच्या ‘क्लार्क एअरबेस’वर जपान व फिलिपाईन्सच्या हवाईदलाचा सराव पार पडल्याची माहिती फिलिपाईन्सकडून देण्यात आली आहे.

leave a reply