अमेरिकेच्या नौदलाकडून परग्रहवासियांच्या उडत्या तबकड्यांचे नवे व्हिडिओज् प्रसिद्ध

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या नौदलाने उडत्या तबकड्यांचे (अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट) तब्बल आठ व्हिडीओज् व त्यासंदर्भातील तपशील प्रसिद्ध केले आहेत. अमेरिकेच्या संरक्षणदलांकडून उडत्या तबकड्यांबाबत तपशील जाहीर करण्याची तीन आठवड्यांमधील ही दुसरी वेळ आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस ‘पेंटॅगॉन’कडून तीन व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले होते. अमेरिकेने उडत्या तबकड्यांबाबत अधिकृत पातळीवर एकापाठोपाठ कबुली देण्यास सुरुवात केल्याने प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर परग्रहवासिय तसेच उडत्या तबकड्यांच्या मुद्यावर पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेतील ‘ड्राईव्ह’ नावाची वेबसाईट तसेच ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीने ‘फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट’ अंतर्गत ही माहिती मिळवल्याचे सांगितले आहे. अमेरिकेच्या ‘नेव्ही सेफ्टी सेंटर’ने २०१३ व २०१४ मध्ये अमेरिकी नौदलाच्या वैमानिकांना आलेल्या आठ अनुभवांची कबुली दिली आहे. या सर्व घटना अमेरिकेच्या व्हर्जिनिया व नॉर्थ कॅरोलिना या राज्यांच्या सागरी हद्दीनजिक घडल्या आहेत.

मार्च २०१४ मधील एका घटनेचे वर्णन करताना वैमानिकाने सुटकेसच्या आकाराचा चांदीच्या रंगाचा धातूचा ‘ऑब्जेक्ट’ दिसल्याचा दावा केला आहे. काही घटनांमध्ये वैमानिकांनी ‘ड्रोन’ तसेच क्षेपणास्त्रांच्या आकाराची वस्तू आढळल्याचे म्हटले आहे. सर्व घटनांचे फोटो तसेच तसेच व्हिडिओ विमानांवरील ‘इन्फ्रारेड कॅमेऱ्या’ने चित्रित करण्यात आल्याची माहिती नौदलाने दिली.

अवघ्या तीन आठवड्यांच्या कालावधीत दुसऱ्या वेळी अमेरिकेकडून उडत्या तबकड्यांचे (अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट) तपशील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात उघड करण्यात आलेल्या माहितीत २००४ व २०१५ सालातील तीन व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर हॅरी रीड यांनी, प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती म्हणजे केवळ पृष्ठभाग खरवडण्यासारखे आहे, अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या नौदलाने पहिल्यांदाच उडत्या तबकड्यांचे (अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट) प्रसिद्ध झालेले व्हिडीओ खरे असल्याची कबुली दिली होती. टॉम डिलॉंज’, ‘टू द स्टार्स ऍकॅडमी ऑफ आर्टस् ऍण्ड सायन्स’ आणि ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ यांनी एकत्र येऊन २०१७ व २०१८ साली सदर व्हिडिओ प्रदर्शित केले होते. त्यानंतर अमेरिकेचे माजी सिनेटर हॅरी रीड यांनी या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर ‘पेंटॅगॉन’ने याबाबत स्वतंत्र चौकशीही सुरू केल्याचे उघड झाले होते. या मुद्यावर अमेरिकेच्या संरक्षण विभागाने संसदीय समितीच्या निवडक सदस्यांना माहिती दिल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते.

leave a reply