दिल्लीत १० हजार बेडचे जगातील सर्वात मोठे कोविड रुग्णालय

Delhi-Covid-Bedनवी दिल्ली – दिल्लीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होत असून रुग्णालयात बेड अपुरे पडू लागले आहेत. रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता दिल्लीच्या छतरपुर येथे जगातील सर्वात मोठे १० हजार बेड्चे ‘सरदार पटेल कोविड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी या सेंटरमधील सोयीसुविधांचा आढावा घेतला.

दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या ८० हजारावर पोहोचली असून जुलैपर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा ५.५ लाखावर पोहचू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दिल्लीतील रुग्णवाढीचा दर पाहता कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. १२ लाख ५० हजार चौरस फूट जागेवर हे सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरच्या उभारणीसाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसांचे (आयटीबीपी) सहाय्य घेण्यात आले होते. या सेंटरमधील एक हजार बेडचा भाग या पूर्वीच सुरु करण्यात आला होता. हे सेंटर पुढील ३ ते ४ दिवसात पूर्ण क्षमतेनिशी सुरु करण्यात येणार आहे. या ठिकाणी ८७५ डॉक्टर आणि सुमारे ८७५ पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसह अन्य स्टाफ असेल. या ठिकाणी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. रुग्णांसाठी हजार बेडसाठी ऑक्सिजनची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

Covid-Bed-Delhiकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या सेंटरमधील सज्जतेचा आढावा घेतला. १० हजार बेडच्या या केंद्रामुळे दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळेल. या सेंटरच्या उभारणीसाठी ‘आयटीबीपी’च्या जवानांनी दिलेल्या योगानंदाचे गृहमंत्र्यांनी कौतुक केले. जवानांनी या कठीण काळात या कोविड केअर सुविधा चालू ठेवल्या. देश आणि दिल्लीच्या जनतेची सेवा करण्याची त्यांची कटीबद्धता अद्वितीय असल्याचे शहा म्हणाले. दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली असल्याचेही त्यांनी म्हटले.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हे केंद्र कृत्रिमरित्या थंड ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रूग्णांच्या भरतीसाठी आणि डिस्चार्जसाठी इलेक्ट्रॉनिक प्रक्रिया अवलंबली जाईल आणि रूग्णांच्या नियमित तपासणी दरम्यान परिचारिका टॅबलेटचा वापर करणार आहेत.

leave a reply