भारताने अफगाणींसाठी केलेल्या सहाय्याचे तालिबानकडून स्वागत

नवी दिल्ली – भारताने अफगाणी जनतेसाठी 50 हजार मेट्रिक टन इतका गहू पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने याचे स्वागत करून भारताचे आभार मानले आहेत. त्याचवेळी पाकिस्तान यामुळे अस्वस्थ झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पाकिस्तान आणि तालिबानमधले चांगले संबंध भारताला नको आहेत, अशी टीका पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री शेख रशिद यांनी केली आहे.

भारताने अफगाणींसाठी केलेल्या सहाय्याचे तालिबानकडून स्वागततालिबानची राजवट आल्यानंतर अफगाणी जनतेवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या आकडेवारीनुसार 47 लाख अफगाणींची 2022 सालात उपासमार होऊ शकते. हे लक्षात भारताने अफगाणी जनतेसाठी सुमारे 50 हजार मेट्रिक टन तसेच इतर मानवी सहाय्याची घोषणा केली होती. सुरूवातीला या सहाय्यासाठी आपल्या देशातून मार्ग खुला करून देण्यासाठी आढेवेढे घेणाऱ्या पाकिस्तानला, तालिबानच्या दडपणामुळे हा मार्ग खुला करावा लागत आहे.

भारताच्या या सहाय्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशंसा होत असून अफगाणी जनता यासाठी भारताचे आभार मानत आहे. याआधीही भारताने अफगाणिस्तानला औषधे व कोरोनाच्या लसी पुरविल्या होत्या. याचे तालिबाननेही स्वागत केले होते. आता भारत अफगाणी जनतेसाठी पुरवित असलेल्या गव्हासाठी तालिबानच्या प्रवक्त्याने भारताचे आभार मानले असून यासाठी आम्ही भारताचे आभारी आहोत, असे म्हटले आहे.

भारत पुरवित असलेल्या या सहाय्यासाठी पाकिस्तानने मार्ग खुला केला, यावरही तालिबानचा प्रवक्ता शाहीन याने समाधान व्यक्त केले. पण या मानवी सहाय्यामुळे भारताचा अफगाणिस्तानवरील प्रभाव अधिकच वाढेल, या चिंतेने पाकिस्तानला ग्रासले आहे. सध्या अफगाणिस्तान व पाकिस्तानमध्ये ड्युरंड लाईनवर तणाव निर्माण झाला असून इथे झालेल्या चकमकीत पाकिस्तानचे जवान मारले गेले आहेत. यामुळे पाकिस्तानच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. पुढच्या काळात तालिबानचे भारताबरोबरील सहकार्य प्रस्थापित होईल आणि पाकिस्तानसमोर नवे आव्हान उभे राहिल, असे पाकिस्तानचे विश्‍लेषक सांगू लागले आहेत.

leave a reply