भारतीय लष्कर लवकरच ‘हाय-टेक’ होणार

- सीमेवरील हेरगिरीसाठी 850 नॅनो ड्रोन्सची तातडीने मागणी

नवी दिल्ली – चीनबरोबरच्या एलएसीजवळ तैनात आपल्या सैनिकांना हाय-टेक शस्त्रास्त्रांनी सज्ज करण्यासाठी भारतीय लष्कराने धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आठवड्यापूर्वी जेट पॅक आणि रोबोटिक मूल्सच्या खरेदीसाठी निविदा मागितल्यानंतर भारतीय लष्कराने नॅनो ड्रोन्सच्या तातडीच्या खरेदीची तयारी केली आहे. लष्कराने 850 नॅनो ड्रोन्सच्या खरेदीची मागणी प्रस्तावित केली असून सदर ड्रोन्स एलएसीजवळ तैनात करण्यात येतील, असा दावा केला जातो. याआधीच भारतीय लष्कराने आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारीत स्वार्म ड्रोन्सच्या खरेदीचे संकेतही दिले होते.

लडाखच्या गलवानमध्ये भारत व चीनच्या लष्करातील संघर्षाला अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात दोन्ही देशांच्या लष्कर व राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या असून अजूनही एलएसीवरील तणाव कायम आहे. चीनने एलएसीजवळील आपली तैनाती वाढविल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचबरोबर गलवानमधील संघर्षात येथील हवामानाशी जुळवून घेण्यात अपयशी ठरलेल्या आपल्या जवानांना हाय-टेक शस्त्रास्त्रे पुरविण्याचे काम चीनने सुरू केले आहे. चीनचे जवान ऑक्सिजन मास्क लावून तसेच एक्सोस्केलेटॉन घालून टेकड्या चढण्याचा सराव करीत असल्याचे व्हिडिओज्‌‍ समोर आले होते.

चीनने एलएसीजवळून तात्पुरती माघार घेतली असली तरी चीनवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही, असे लष्करी विश्लेषक बजावत आहेत. त्यामुळे भारताने देखील चीनच्या तोडीस तोड एलएसीजवळ सैन्यतैनाती करावी. तसेच आपल्या जवानांना देखील अतिप्रगत व हाय-टेक शस्त्रास्त्रांनी सज्ज करावे, असे लष्करी विश्लेषक व माजी लष्करी अधिकारी सुचवित आहेत.

भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील लष्कराचा चेहरामोहरा बदलण्याचे संकेत दिले होते. आर्टिफिशल इंटेलिजन्स, स्वार्म तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा इरादा भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून दाखविला होता. लवकरच भारतीय लष्करात सामील होणारे अग्नीवीर हाय-टेक तंत्रज्ञानाने प्रशिक्षित असतील, असेही या अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिले होते.

गेल्या वर्षभरात भारतीय लष्कराने देशांतर्गत शस्त्रनिर्मिती कंपन्यांना यासंबंधी दिलेल्या ऑर्डर्स लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या होत्या. भारतीय लष्कराला 2200 ड्रोन्सची आवश्यकता असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामध्ये मालवाहतुकीसाठी 363 लॉजिस्टिक ड्रोन्स, हेरगिरीसाठी सुमारे 1000 हेलिकॉप्टर्स ड्रोन्स अशा इतर ड्रोन्सच्या खरेदीसाठी भारतीय लष्कराने कोट्यवधी डॉलर्स खर्च करण्याची तयारी केल्याची माहिती समोर आली होती. अमेरिकेने भारताला ‘एमक्यू-9बी’ प्रिडेटर हल्लेखोर ड्रोन्स देण्यासाठी तयार असल्याचे जाहीर केले.

तर आता भारतीय लष्कराने 850 नॅनो ड्रोन्सच्या खरेदीसाठी ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोझल-आरएफपी’ पाठविल्याची माहिती समोर येत आहे. एलएसीजवळ चीनच्या लष्कराच्या हालचाली टिपण्यासाठी हे नॅनो ड्रोन्स उपयोगी पडू शकतात. शत्रूच्या नजरेस न पडता हे ड्रोन्स मोठी कामगिरी बजावू शकतात, असा लष्करी विश्लेषकांचा दावा आहे. देशी बनावटीच्या नॅनो ड्रोन्सना लष्कर प्राधान्य देत आहे. गेल्याच आठवड्यात लष्कराने जेट पॅक सूट आणि रोबोटिक मूल्सच्या खरेदीसाठी निविदा जारी केली होती. या दोन्ही गोष्टींचा वापर चीनच्या एलएसीजवळ तैनात भारतीय लष्करासाठी केला जाणार असल्याचा दावा केला जातो. जेट पॅक सूटच्या सहाय्याने टेहळणी तर रोबोटिक मूल्स अर्थात खेचरांच्या सहाय्याने लष्कराचे सामान टेकड्यांवर उचलून नेण्यासाठी सहाय्य मिळू शकते. अशा तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये आत्ता भारताचाही समावेश होऊ शकतो.

leave a reply