जगाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता भारताकडे आहे

- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला भारताच्या पंतप्रधानांचा संदेश

नवी दिल्ली – कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सावधपणे मुकाबला करीत असलेल्या भारताने जगाला आशावादाचा पुष्पगुच्छ दिला आहे. भारतीयांचा लोकशाहीवरील प्रगाढ विश्‍वास, २१ व्या शतकासाठी आवश्यक असलेली मानसिकता, तंत्रज्ञान तसेच कुशलताही भारत जगाला देत असलेल्या या पुष्पगुच्छामध्ये आहे. भारताकडे जगाच्या आशा व आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता आहे, असे सांगून पंतप्रधानांनी कोरोनाच्या संकटात भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला केलेल्या सहाय्याचा दाखला दिला. तसेच जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र म्हणून भारत उदयाला येत आहे, याचीही जाणीव करून दिली.

जगाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता भारताकडे आहे - वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला भारताच्या पंतप्रधानांचा संदेशडॅव्होस येथे होणार्‍या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत जगाला देत असलेल्या योगदानाची माहिती दिली. वन अर्थ, वन हेल्थ या तत्त्वानुसार जगातील तिसर्‍या क्रमांकाचा औषधनिर्मिती करणारा देश असलेल्या भारताने कोरोनाच्या लसी व औषधांचा कित्येक देशांना पुरवठा केला. यामुळे कोट्यावधी जणांचे प्राण वाचले. आत्ताच्या काळातही कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सावधपणे व निर्धाराने मुकाबला करीत असलेल्या भारताने आपल्या आर्थिक प्रगतीवर याचा परिणाम होऊ दिला नाही. २०१४ सालापासून भारतात ६० हजार स्टाटअप्सची नोंद झाली असून देशातील युनिकॉर्न अर्थात एक अब्ज डॉलर्सची वेस ओलांडणार्‍या कंपन्यांची संख्या ४४ वर गेली आहे. यातील ४० युनिकॉर्न्सची २०२१ सालातच नोंद झाली, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

भारत सार्‍या जगाला सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचा पुरवठा करीत आहे. त्याचवेळी भारतात कार्यरत असलेल्या सॉॅफ्टवेअर इंजिनिअर्सची संख्या ५० लाख इतकी आहे. तर भारताकडे सर्वात मोठा व सुरक्षित आणि यशस्वी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असून केवळ गेल्याच महिन्यात युपीआयद्वारे ४.४ अब्ज व्यवहारांची नोंद झालेली आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. जागतिक कुटुंब म्हणून आपल्यासमोर फार मोठी आव्हाने उभी राहिलेली आहे. जागतिक व्यवस्थेत बदल होत असताना, क्रिप्टोकरन्सीच्या तंत्रज्ञानामुळे उभ्या राहिलेल्या आव्हानाची जाणीव पंतप्रधानांनी करून दिली. कुठलाही एक देश या क्रिप्टोकरन्सीने उभ्या केलेल्या या आव्हानाचा सामना करू शकत नाही. त्यासाठी सर्वच देशांनी एकजुटीने याबाबत समान भूमिका स्वीकारणे गरजेचे आहे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

leave a reply