भूतानच्या सीमेजवळील चीनच्या कारवायांविरोधात भारत पावले उचलत आहे

-परराष्ट्र मंत्रालयाची ग्वाही

Arindam-Bagchiनवी दिल्ली – 2017 साली भारत-चीन व भूतानच्या सीमेवरील डोकलाममध्ये घुसखोरी करून इथे वर्चस्व प्रस्थापित करू पाहणाऱ्या चिनी लष्कराला भारतीय सैन्याने रोखले होते. 16 जून पासून 28 ऑगस्ट 2017 पर्यंतच्या 73 दिवसात भारताने चिनी लष्कराला पुढे येऊ दिले नव्हते. यावर चीनने भारताला युद्धाच्या धमक्या दिल्या होत्या. भारताने चीनचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही. पण आता पुन्हा एकदा चीन घुसखोरी करून भूतानच्या सीमेवर गाव वसविण्याचा प्रयत्न करीत आहे. याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर, पररराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या प्रत्येक हालचालींवर देशाची करडी नजर रोखलेली असल्याची माहिती दिली. देशाची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात असल्याची महिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

डोकलामच्या कांगडा गावाजवळ चीन नवा गाव वसवित असल्याची माहिती माध्यमांमध्ये आली होती. त्याची दखल परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे. 2017 साली जिथे भारत व चीनच्या लष्कराचा संघर्ष झाला तिथून काही अंतरावर चीनने बांधकाम सुरू केल्याचे सांगितले जाते. पण चीनच्या या हालचालींवर भारताची नजर रोखलेली आहे. याविरोधात आवश्यक असलेली सारे पावले भारताकडून उचलली जात आहेत, अशी ग्वाही पररराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिदंम बागची यांनी दिली. याआधीही चीन भारताच्या एलएसीमध्ये घुसून गाव वसवित असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्य. या भूभागावर जरी भारताचा अधिकार असला तरी गेल्या काही दशकांपासून हा भूभाग चीनच्या ताब्यात आहे, याकडे भारतीय लष्कराने लक्ष वेधले होते.

Doklamअसे असताना, चीन भारताच्या सरकारवर दबाव टाकण्यासाठी जाणीवपूर्वक आपल्या लष्कराने भारताच्या भूभागात अतिक्रमण केल्याचा आभास निर्माण करीत आहे. याद्वारे भारतीय जनतेचे मनोधैर्य खच्ची करून आपल्या सैन्यावरील भारतीयांचा विश्वास उडविण्याचे कारस्थान चीनने आखले आहे. अशा अपप्रचाराच्या मोहिमांपासून देशाने सावध रहावे, असा इशारा भारतीय नेते व वरिष्ठ लष्करी अधिकारी सातत्याने देत आहेत. त्याचवेळी भारतीय सैन्याकडून तसेच परराष्ट्र मंत्रालयाकडून चीनचा अपप्रचार खोडून काढण्यासाठी वारंवार पावले टाकण्यात येत आहेत. यामुळे चीनच्या या डावपेचांना अद्याप फारसे यश मिळू शकलेले नाही.

दरम्यान, भूतानसारख्या छोट्या देशाला आमीष दाखवून चीन या देशात घुसखोरी करण्याचे प्रयत्न करीत आला आहे. भारत व भूतानमध्ये पार पडलेल्या 1949 सालच्या करारानुसार भूतानचे परराष्ट्र धोरण भारताकडून निर्धारित केले जाते. आत्तापर्यंत भारताने चिमुकला देश असलेल्या भूतानचा भूभाग बळकवण्याचा विचारही केलेला नाही. उलट भारताने भूतानला आजवर सर्वतोपरी सहकार्यच केलेले आहे.

leave a reply