जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा मध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त

श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या पुछ जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात एका जवानाला वीरमरण आले. त्याचवेळी कुपवाडामध्ये सुरक्षादलाने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असून या परिसरातून स्नायपर रायफल, ग्रेनेडसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. हा शस्त्रसाठा पाहिल्यास दहशतवादी मोठ्या घातपाताच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. तसेच सीमासुरक्षा दलाच्या जवानांना हिरानगर भागात पाकिस्तानी ड्रोन दृष्टीस पडल्याचे वृत्त आहे.

Jammu-Kashmirकुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये सुरक्षादलाच्या जवानांना संशयीत हालचाली दृष्टीस पडल्या. त्यानंतर सुरक्षादलाने याभागात शोध मोहीम हाती घेतली. यावेळी सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. मात्र दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी या भागात शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी या भागातून एक स्नायपर रायफल, आठ हँड ग्रेनेड तीन एके रायफल आणि अन्य शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

सुरक्षादलाकडून दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमत यावर्षी सुमारे १४० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर दहशतवाद्यांची ठिकाणे उद्वस्थ करत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. २७ जुलै रोजी पुछ आणि शोपियनमध्ये सुरक्षादलाने दहशतवाद्यांचे ठिकाण नष्ट करून अत्याधुनिक आयईडी आणि स्फोटकांचा साठा जप्त केला होता.

२३ जुलै रोजीदेखील राजौरी जिल्ह्यात सुरक्षादलाने केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचे ठिकाण उद्धवस्त करण्यात आले होते. यावेळी पीका रायफल, एक चिनी पिस्तूल, देशी पिस्तूल, एके-४७ चे मॅगझीन, पिस्तूलचे चार राऊंड , १६८ पीका रायफलचे राउंड , दोन अंडर बॅरल ग्रेनेड लॉंचर, एक दुर्बिणी, एक अँटेना, एक टेप रेकॉर्डर जप्त करण्यात आला होता. मागील काही घटनांमध्ये दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यात चीनच्या अमेरिकन आणि रशियन शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत.

leave a reply