इस्रोकडून ‘ईओएस-०१’सह १० उपग्रहांचे प्रक्षेपण

प्रक्षेपणनवी दिल्ली – अंतराळातून भारतीय संरक्षणदलांची टेहळणी क्षमता वाढविणाऱ्या ‘अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाईट -०१’चे (ईओएस- ०१) इस्रोने शनिवारी प्रक्षेपण केले. ‘पीएसएलव्ही सी ४९’ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने एकूण १० उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये ९ परदेशी उपग्रहांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल इस्रोच्या संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

शनिवारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून दुपारी ३ वरून १२ मिनिटांनी उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. दुपारी ३ वाजून २ मिनिटांनी या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार होते. पण खराब हवामानामुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते. ‘पीएसएलव्ही’ ची ही ५१ वी मोहीम होती. तर कोरोनाच्या काळात देखील इस्रोतर्फे यशस्वीपणे उपग्रहांचे प्रक्षेपण करीत आपली क्षमता पुन्हा एकदा दाखवून दिली.

शनिवारी प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांमध्ये भारताच्या ‘ईओएस ०१’ या अर्थ ऑब्झर्वेशन सॅटलाईट समावेश होता. या उपग्रहाचा उपयोग शेती, जंगलांचे मॅपिंग आणि आपात्कालिन परिस्थितीत मदतीसाठी होणार आहे .विशेष म्हणजे हे रडार इमेजिंग सॅटेलाईट आहे. या उपग्रहाची भारतीय लष्कराला मोठी मदत होऊ शकते. मिलिटरी सर्व्हिलन्ससाठी या उपग्रहाचा वापर केला जाऊ शकतो असा दावा केला जातो.

प्रक्षेपण

कोणत्याही वातावरणात आणि रात्रीच्या मिट्ट काळोखातही हाय रिझोल्युशनचे फोटो या उपग्रहाद्वारे मिळू शकतात. ढगांचे अडथळे भेदून हाय रिझोल्युशनचे फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहावरील सिंथेटिक एपर्चर रडारमध्ये (एसएआर) आहे. यामुळे चीन सीमेवरील हालचालीही आता अधिक स्पष्टपणे टिपता येऊ शकतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे ‘ईओएस ०१’च्या प्रक्षेपणाचे महत्व वाढते. दरम्यान, इस्रोतर्फे प्रक्षेपित करण्यात आलेल्या परदेशी उपग्रहांमध्ये अमेरिका आणि लक्झेंबर्गचे प्रत्येकी चार आणि लिथुआनियाच्या एका उपग्रहाचा समावेश होता.

शनिवारच्या प्रक्षेपणानंतर इस्रोतर्फे प्रक्षेपित केलेल्या परदेशी उपग्रहांची संख्या ३२८ वर पोहोचली आहे. इस्रोकडून या प्रक्षेपणाचे वेबसाईट, यूट्यूब चॅनल, फेसबुक आणि ट्विटर पेजवरूनही थेट प्रक्षेपण करण्यात आले.

leave a reply