स्थिर व सुरक्षित इंडो-पॅसिफीक क्षेत्रासाठी भारत-जपानची भागिदारी महत्त्वाची

-पंतप्रधान नरेंद्र मोदी

टोकियो – भारत-जपानचे संबंध नव्या जबाबदाऱ्या आणि ध्येय घेऊन अधिक मजबूतीने पुढे जात आहेत. भारत आणि जपानमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेल्याला 70 वर्ष उलटली आहेत. मात्र दोन्ही देशांच्या या मैत्रीच्या नात्यातील सर्वोत्तम असे अजूनही यावयाचे आहे. विशेष, धोरणात्मक आणि वैश्विक हे तीन शब्द दोन देशांच्या संबंधांना परिभाषित करण्यासाठी तोकडे आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि जपानमधील संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले. जपानचे पंतप्रधान फुमिओ काशिदा यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून क्वाड बैठकीत भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये पोहोचले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

India-Japan-partnershipसोमवारी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी कित्येक जपानी उद्योजकांच्या भेटी घेतल्या. जपानमधील उद्योजकांनी भरविलेल्या भारत-जपान व्यापारी गोलमेज परिषदेचे अध्यक्षस्थान पंतप्रधानांनी भूषविले. या बैठकील जपानच्या बड्या कंपन्यांचे प्रमुख व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. तसेच जपानच्या विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीनींही यामध्ये सहभाग घेतला होता. भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी जपानी उद्योजकांना केले.

जागतिक पातळीवर गुंतवणुकीचा ओघ मंदावला आहे. असे असतानाही भारतात गेल्या आर्थिक वर्षात 84 अब्ज अमेरिकी डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे, ही बाब अधोरेखित करीत भारताच्या क्षमतेवर जगाने दाखविलेला हा विश्वास असल्याचा दावा पंतप्रधानांनी यावेळी केला.

टोकियोमधील व्यापारी परिषदेनंतर जपानमधील भारतीय समुदायालाही पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. यावेळी स्वामी विवेकानंदांचा दाखला देत पंतप्रधानांनी जपानच्या युवकांनी जीवनात एकदा भारतात यावं, असं आवाहन केले. जपान भारताच्या विकासामधील महत्वाचा भागीदार आहे आणि हे दोन्ही देश विकासाच्या मार्गावरील नैसर्गिक साथीदार आहेत, याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले. तसेच आज संपूर्ण जगाला भगवान बुद्धांच्या विचांरांवर चालण्याची आवश्यकता असून मानवतेला वाचविण्याचे मोठे आव्हान जगासमोर असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी कोरोनाच्या संकटाच्या काळात भारताने जगाला लस, औषध व अन्नधान्याच्या पुरवठ्याचा केलेल्या सहाय्याचा उल्लेख केला.

दरम्यान याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक लेख अग्रगण्य जपानी वृत्तपत्रात प्रकाशित झाला. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांच्या 70 वर्षाच्या राजनैतिक संबंध व प्रवासाकडे लक्ष वेधताना काही गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. इंडो-पॅसिफीक क्षेत्रातील स्थिरता व सुरक्षेमध्ये भारत व जपान प्रमुख स्तंभ आहेत. सामरिक दृष्ट्या इंडो-पॅसिफीक क्षेत्रातील स्थिर लोकशाही देश असल्याने दोन्ही देशांची भागिदारी या क्षेत्रातील शांतता, स्थैर्य आणि भरभराटीसाठी आवश्यक आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे. मुक्त, खुले व सर्वसमावेशक इंडो-पॅसिफीक क्षेत्र, सागरी सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, सार्वभौमत्त्वाचा आदर, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन यासाठी भारत आणि जपान आपले योगदान देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

leave a reply