सुरक्षा परिषदेच्या अफगाणिस्तानविषयक बैठकीपासून भारताने पाकिस्तानला दूर ठेवले

- पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचा आरडाओरडा

संयुक्त राष्ट्रसंघ – सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आलेल्या भारताने अफगाणिस्तानबाबत तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. अफगाणिस्तानातील रक्तरंजित संघर्ष आणि शत्रूत्त्व संपुष्टात आणण्याच्या सुरक्षा परिषदेचे सदस्य व इतर देशांच्या प्रयत्नांना या बैठकीमुळे चालना मिळाली, असे संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत टी. एस. तिरूमुर्ती यांनी म्हटले आहे. तर या बैठकीत अफगाणिस्तानचा शेजारी असलेल्या पाकिस्तानला बोलावण्यात आले नाही, अशी खंत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे. तसेच या बैठकीचा वापर पाकिस्तानविरोधी प्रचारासाठी करण्यात आल्याची टीका या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.

सुरक्षा परिषदेच्या अफगाणिस्तानविषयक बैठकीपासून भारताने पाकिस्तानला दूर ठेवले - पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचा आरडाओरडाअफगाणिस्तानच्या सरकारने केलेल्या मागणीनुसार, शुक्रवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक भारताने बोलावली होती. ऑगस्ट महिन्यात सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही अफगाणिस्तानविषयक बैठक आयोजित करण्यात आली ही फार मोठी बाब ठरते, असे राजदूत तिरूमुर्ती यांनी लक्षात आणून दिले. ही बैठक अत्यंत महत्त्वाची व औचित्यपूर्ण ठरली, असे सांगून राजदूत तिरूमुर्ती यांनी यामुळे सदस्यदेशांना अफगाणिस्तानातील भयावह परिस्थितीची अधिक प्रखरतेने जाणीव झाल्याचे म्हटले आहे. विशेषतः अफगाणिस्तानातील हिंसाचाराचा मुले आणि महिला तसेच अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचारांचा मुद्दा यामुळे अधिक प्रभावीपणे जगासमोर आला, असे तिरूमुर्ती पुढे म्हणाले.

या बैठकीत अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेणार्‍या अमेरिकेने तालिबानवर सडकून टीका केली. तालिबानने लष्करी बळाचा वापर करून अफगाणिस्तानचा ताबा घेतला, तरी आंतरराष्ट्रीय समुदाय त्याला मान्यता देणार नाही. म्हणूनच तालिबानने आंतरराष्ट्रीय समुदायाचे ऐकले पाहिजे, असे अमेरिकेने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले होते. तर अफगाणिस्तानचे संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत गुलाम इसाकझई यांनी तालिबानच्या अफगाणिस्तानातील हिंसाचारामागे पाकिस्तान आहे, असा ठपका ठेवून याचे पुरावेही उपलब्ध असल्याचे या बैठकीत जाहीर केले. तालिबानी दहशतवादी पाकिस्तानच्या सीमेत शिरून अफगाणिस्तानात युद्ध करण्यासाठी पैसे जमवित आहेत, तालिबानच्या जखमी दहशतवाद्यांवर पाकिस्तानात उपचार होत आहेत, याकडे अफगाणिस्तानच्या राजदूतांनी लक्ष वेधले. पाकिस्तानच्या या कारवाया म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या कलमांचे धडधडीत उल्लंघन ठरते, असा आरोप राजदूत इसकझई यांनी केला.

सुरक्षा परिषदेच्या या बैठकीत पाकिस्तानचा निकटतम मित्रदेश असलेल्या चीनने पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही. रशियानेही याबाबत काहिसे तटस्थ धोरण स्वीकारले होते. यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला असून या बैठकीवर पाकिस्तानने टीका केली आहे. सदर बैठकीत अफगाणिस्तानचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला बोलावण्यातच आले नव्हते, अशी टीका पाकिस्तानने केली आहे. तसेच या बैठकीचा वापर पाकिस्तानविरोधी प्रचारासाठी करण्यात आल्याचा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला.

अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर भारताने पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक राजनैतिक हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचवेळी पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे फसल्याचे दिसते. चीनसारख्या निकटतम मित्रदेशाने देखील यावेळी सुरक्षा परिषदेत पाकिस्तानची बाजू घेतली नाही, हे भारताला मिळालेले यश ठरते, अशी टीका पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी व पत्रकार करीत आहेत. पुढच्या काळात अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर भारत पाकिस्तानची अधिकच कोंडी करील, त्यात अमेरिका देखील भारताला साथ देईल, अशी चिंता पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी व माध्यमे व्यक्त करीत आहेत.

leave a reply