युक्रेन युद्धाबाबत भारताने एकांगी धोरण स्वीकारले नाही – रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह

एकांगी धोरणनवी दिल्ली – गुरूवारी भारताच्या दौर्‍यावर आलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा भारताच्या पंतप्रधानांसाठी विशेष संदेश घेऊन आपण इथे आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी दिली. त्याचवेळी युक्रेनमधील युद्धाची स्थिती आणि शांतीचर्चेबाबतचे तपशील रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले. याबरोबरच रशिया पुढच्या काळात भारताच्या चलनात व्यवहार करील, असे संकेत देऊन करून परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी अमेरिकेची अधिकच चिंता वाढविली आहे.

दोन दिवसांच्या भारतभेटीवर आलेल्या रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युक्रेनच्या युद्धाबाबत भारताने स्वीकारलेल्या वस्तूनिष्ठ धोरणाची प्रशंसा केली. भारताने या युद्धाबाबत एकांगी धोरण स्वीकारलेले नाही. संकुचिपतपणे एकाच गोष्टीचा विचार न करता व्यापक दृष्टीने भारताने या समस्येकडे पाहिले, असे सांगून परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी भारताचे कौतूक केले. रशिया संरक्षणक्षेत्रातील भारताबरोबरील सहकार्य यापुढेही वाढवित राहिल. भारताला रशियाकडून जे काही खरेदी करायचे असेल, ते उपलब्ध करून दिले जाईल. यात इंधनतेलाचाही समावेश आहे, असे लॅव्हरॉव्ह पुढे म्हणाले.

एकांगी धोरणयुक्रेनमधील युद्धानंतर अमेरिकेने रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. यामुळे रशिया व रशियाबरोबर व्यवहार करू पाहणार्‍या देशांना डॉलरमध्ये व्यवहार करणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत रशिया देशांच्या स्थानिक चलनांमध्ये व्यवहार करणार असल्याची घोषणा रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी केली. रशिया व्यवहारांमध्ये येत असलेले हे अडथळे दूर करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थेचा वापर करील, असे सांगून नजिकच्या काळात रुपया व रूबलमध्ये व्यवहार शक्य असल्याचे संकेत लॅव्हरोव्ह यांनी दिले.

भारत व रशियाच्या संबंधांचे मैत्रीपूर्ण या एकाच शब्दात वर्णन करता येईल, असे सांगून हे संबंध खडतर परिस्थितीतही कायम राहिले होते, याची आठवण रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली. त्यांची ही विधाने भारतीय माध्यमांमध्ये गाजत आहेत. त्याचवेळी अमेरिकेसाठी आपला विश्‍वासू मित्रदेश असलेल्या रशियाची साथ सोडण्यास भारत तयार नसल्याचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांच्या या दौर्‍यातून उघड झाल्याचे दावे विश्‍लेषक करीत आहेत.

युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात तीन वेळा फोनवरून चर्चा पार पडली आहे.

leave a reply