लडाखच्या एलएसीवरील सहमतीमुळे भारताने काहीही गमावलेले नाही

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची ग्वाही

गमावलेलेनवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरून सैन्य मागे घेण्यावर भारत आणि चीनची सहमती झाल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी जाहीर केले. असे असले तरी भारताने आपल्या सार्वभौमत्त्वाशी अजिबात तडजोड केलेली नाही आणि एलएसीवरील चीनचे दावे मान्य केलेले नाहीत, हे संरक्षणमंत्र्यांनी ठासून सांगितले. चीनबरोबर झालेल्या या सहमतीमुळे भारताने काहीही गमावलेले नाही, असे राजनाथ सिंग यांनी राज्यसभेतील आपल्या भाषणात स्पष्ट केले.

चीनच्या जवानांनी लडाखच्या एलएसीजवळून माघार घेण्याची तयारी सुरू केली आहे. चीनचे दोन रणगाडे या क्षेत्रातून माघारी फिरत असल्याचे व्हिडिओज् प्रसिद्ध झाले आहेत. भारताबरोबर झालेल्या सहमतीनुसार चीनचे जवान लडाखच्या पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील क्षेत्रातील फिंगर आठपर्यंत माघार घेईल. यानंतर भारतीय सैन्य आपल्या धनसिंग थापा पोस्ट या फिंगर तीनजवळील चौकीपर्यंत मागे येईल. पँपाँग सरोवराच्या दक्षिणेकडेही अशीच कारवाई केली जाईल. पुढच्या काळात या क्षेत्रात दोन्ही देशांचे लष्कर गस्त घालणार नाही, यावरही एकमत झाले आहे.

गमावलेलेराजनैतिक व लष्करी पातळीवरील चर्चेत एलएसीचा वाद मिटल्यानंतरच दोन्ही देशांचे लष्कर या क्षेत्रात गस्त घालू शकेल, असे निश्‍चित झाले आहे. गस्त घालताना दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये पुन्हा संघर्ष उद्भवू शकतो, ही बाब लक्षात घेऊन सदर तरतूद करण्यात आल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात माहिती देताना संरक्षणमंत्र्यांनी एलएसीबाबतची भारताची भूमिका सुस्पष्टपणे मांडली. चीनचा भारताच्या भूभागावरील दावा कधीही मान्य केला जाणार नाही, अशी ग्वाही संरक्षणमंत्र्यांनी राज्यसभेत दिली. गलवान खोर्‍यातील संघर्षात देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणार्‍या २० शहीद सैनिकांचा यावेळी संरक्षणमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. या शहीद सैनिकांची देशाला कधीही विस्मृती होणार नाही, असे राजनाथ सिंग म्हणाले.

गलवान खोर्‍यातील संघर्षात भारतीय लष्कराचा पराक्रम व निर्धार याचा सार्‍या जगाने प्रत्यय घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय लष्कराने देशाच्या रक्षणासाठी दाखविलेल्या निर्धाराचीही यावेळी संरक्षणमंत्र्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. दरम्यान, भारताच्याही आधी चीनने लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यावर सहमती झाल्याची घोषणा केली होती. लडाखच्या एलएसीवर घुसखोरी करून भारतीय सैन्याला आव्हान देऊन चीनच्या हाती मानहानीखेरीज दुसरे काहीही लागले नाही. पण भारतीय लष्कराची क्षमता यामुळे सिद्ध झालेली आहे, असे सांगून माजी लष्करी अधिकारी यावर समाधान व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, चीनचे लष्कर लडाखच्या एलएसीवरून माघार घेत असताना लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी सूचक विधान केले आहे. देशाच्या उत्तर सीमेवरून सुरक्षेला मिळणारे आव्हान खडतर आहे. मात्र त्याचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराची पूर्ण तयारी आहे, असे जनरल नरवणे यांनी म्हटले आहे.

leave a reply