चीनचा सैन्यमाघारीचा प्रस्ताव भारताने पुन्हा एकदा धुडकावला

नवी दिल्ली – लडाखच्या ‘एलएसी’वर तैनात असलेल्या चिनी जवानांची अवस्था इथल्या हिवाळ्यामुळे बिकट बनलेली असतानाच, चीनने भारताला पुन्हा एकदा सैन्यमाघारीचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त आहे. मात्र, चीनला पुन्हा विश्वासघात करण्याची संधी मिळू द्यायची नाही, असा निर्धार केलेल्या भारताने चीनचा हा प्रस्ताव नाकारल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे भारतावर दडपण वाढविण्यासाठी चीन अक्साई चीनच्या भूभागात मोठ्या प्रमाणात लष्करी बांधकाम करीत आहे. त्यामुळे वरकरणी ‘एलएसी’वर शांतता प्रस्थापित करण्याची भाषा चीन बोलत असला तरी, या देशाने भारताचा घात करण्याचा विचार सोडून दिलेला नाही, हे नव्याने उघड होत आहे.

सैन्यमाघारीचा प्रस्ताव

चीनने लडाखच्या ‘एलएसी’वर सुमारे ६० हजार जवान तैनात केल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी म्हटले होते. याच्याबरोबरीने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व संरक्षण साहित्यही ‘एलएसी’वर आणून चीनने भारताला धमकावण्याचा पुरेपूर प्रयत्‍न करुन पाहिला. मात्र भारताने तोडीस तोड तैनाती करुन चीनला मुखभंग करणारे प्रत्युत्तर दिले. लडाखसह अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या ‘एलएसी’वर भारतीय लष्कर व वायुसेना कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे इशारे भारताकडून चीनला देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर, चीन भारताने या क्षेत्रातून माघार घ्यावी, अशी पुन्हापुन्हा मागणी करीत आहे.

विशेषत: २९-३० ऑगस्ट रोजी लडाखच्या पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडील भारतीय सैनिकांनी ताब्यात घेतलेल्या टेकड्या चीनसाठी धक्कादायक बाब ठरली होती. यामुळे भारतीय सैन्य या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्याच्या स्थितीत आहे. प्रयत्‍न करुनही भारतीय सैन्याला इथून माघार घ्यायला लावण्यास चीनचे लष्कर अपयशी ठरले होते. म्हणूनच चीन या ठिकाणाहून भारताने माघार घ्यावी, अशी मागणी लावून धरत आहे. मात्र, चीनने अशारितीने मागण्या न करता संपूर्ण सैन्यमाघारीच्या प्रस्तावावर विचार करावा, अशी भारताची भूमिका आहे. त्याला चीन तयार नाही. मात्र, लडाखमधला हिवाळा चिनी जवानांसाठी आता भारी पडू लागल्याचे दिसते आहे. म्हणूनच वेगवेगळ्या मार्गाने या क्षेत्रातील लष्करी उपस्थिती कायम ठेवण्याची धडपड चीन करीत आहे. या क्षेत्रापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘अक्साई चीन’मध्ये चिनी लष्कराने मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केले आहे. हा देखील चीनच्या याच रणनीतिचा भाग ठरतो.

सीमावाद सोडविण्यासाठी उभय देशांच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या सात फेर्‍या पार पडल्या. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्‍न करुन व गलवान व्हॅलीत भ्याड हल्ला चढवून चीनने आपले फार मोठे नुकसान करुन घेतले, असा निष्कर्ष जगभरातील विश्लेषक नोंदवित आहेत. चीनलाही याची जाणीव झाली असून सध्या चीन या सीमावादात आपली प्रतिष्ठा वाचविण्यासाठी धडपडत असल्याचे दिसते. मात्र भारत यावेळी चीनला तशी संधी देण्याचे औदार्य दाखविण्याच्या मनस्थितीत नाही. भारतात चीनच्या विरोधात प्रचंड संतापाची भावना आहे व त्याचे प्रतिबिंब भारत सरकारच्या धोरणावर पडले आहे. यामुळे चीनच्या विरोधात आक्रमक निर्णय घेण्याचा सपाटाच भारत सरकारने लावला आहे. याबरोबरच चीनच्या विरोधात इतर देशांबरोबरील सहकार्य वाढविण्यासाठी भारताने अधिक सक्रीय भूमिका स्वीकारली आहे.

leave a reply