अफगाणिस्तानच्या शांतीप्रक्रियेत भारताला महत्त्वाचे स्थान

- अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री

शांतीप्रक्रियेतनवी दिल्ली – अफगाणिस्तानच्या शांतीप्रक्रियेत भारताला महत्त्वाचे स्थान आहे, असे अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद हनीफ अत्मर म्हणाले. अफगाणिस्तान तसेच या क्षेत्रातील स्थैर्य व सुरक्षा तसेच शांती यामध्ये भारताचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानातील घडामोडींमध्ये भारताचा सहभाग वैध ठरतो, याचीही जाणीव अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली. अफगाणिस्तानच्या शांतीप्रक्रियेत भारताचा सहभाग असता कामा नये, अशी मागणी पाकिस्तानकडून केली जाते. त्या पार्श्‍वभूमीवर, अफगाणी परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली ही विधाने लक्षवेधी ठरतात.

अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचीही अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भेट घेतली. या भेटीत अफगाणिस्तानातील परिस्थितीवर सखोल चर्चा झाल्याचे सांगितले जाते. तालिबान अफगाणिस्तानच्या राजकीय प्रक्रियेत सहभागी होणार असेल, तर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी राजकीय त्याग करायला तयार असून ते नव्याने निवडणूक घेतील, अशी महत्त्वाची माहिती यावेळी परराष्ट्रमंत्री अत्मर यांनी दिली. त्याचवेळी तालिबानबाबत भारताने कोणती भूमिका स्वीकारायची, याचा निर्णय सर्वस्वी भारतानेच घ्यायचा आहे, असे परराष्ट्रमंत्री अत्मर यावेळी म्हणाले.

आधीच्या काळात भारताने तालिबान ही दहशतवादी संघटना असल्याचे सांगून तालिबानबरोबरील करार करणार्‍या अमेरिकेला सज्जड इशारा दिला होता. पण तालिबानने मात्र आपण भारताशी चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगून यापुढे आपण पाकिस्तानच्या तालावर नाचणार नाही, असा संदेश भारताला दिला होता. काही भारतीय विश्‍लेषक देखील तालिबानबाबतची भूमिका बदलण्याची वेळ आलेली आहे, असा सल्ला भारत सरकारला देत आहेत. सध्या अफगाणिस्तानात सुरू असलेल्या घडामोडींचा दाखला देऊन या विश्‍लेषकांनी भारताला काळजीपूर्वक भूमिका स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेच्या सैन्यमाघारीवरून अफगाणिस्तानात मोठ्या उलथापालथी सुरू आहेत. तालिबानशी केलेल्या करारानुसार अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घ्यायचे की नाही, याबाबत अमेरिकेचे प्रशासन गोंधळलेले असल्याचे दिसते. अफगाणिस्तानात हिंसाचाराचे भयंकर सत्र सुरू करून तालिबानने पुन्हा एकदा आपले शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. तर अफगाणी लष्कराकडून याला जोरदार प्रत्युत्तर मिळत आहे. पाकिस्तान, चीन, रशिया, इराण हे देश अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी उचलून धरत आहेत. अफगाणिस्तानचे लोकनियुक्त सरकार मात्र अमेरिकेच्या सैन्यमाघारीचे भीषण परिणाम होतील, असा इशारा देत आहेत. भारतानेही अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेऊ नये, असे बजावले होते.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी नुकताच भारताचा दौरा केला होता. या दौर्‍यात अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती दिली जाते. त्याला एक दिवस उलटत नाही तोच अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारतभेटीवर आले आहेत. हा योगायोग नाही तर अफगाणिस्तानातील परिस्थितीकडे भारत अत्यंत गंभीरपणे पाहत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

leave a reply