इस्रोकडून ‘फ्री स्पेस क्वांटम कम्युनिकेशन’ची चाचणी

- भारताचा जगातील मोजक्या देशांच्या यादीत समावेश

‘फ्री स्पेस क्वांटम कम्युनिकेशन’बंगळुरू – ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने (इस्रो) प्रकाश कणांच्या सहाय्याने संदेशाची देवाणघेवाण करणार्‍या ‘फ्री स्पेस क्वांटम कम्युनिकेशन’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची चाचणी घेतली आहे. ही चाचणी यशस्वी ठरली असून असे तंत्रज्ञान असलेल्या जगातील मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे संदेशवहन अत्यंत सुरक्षित असून कोणालाही ते हॅक करता येत नाही, असा दावा केला जातो. पुढील काळात संरक्षणदलांसाठी आणि गोपनिय संपर्कासाठी या तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे.

सोमवारी इस्रोने ३०० मीटर अंतरावरील दोन ठिकाणांमध्ये ‘फ्री स्पेस क्वांटम कम्युनिकेशन’ने संपर्क स्थापन केला. या तंत्रज्ञानाला ‘क्वांटम क्रिप्टोग्राफी’ या नावानेही ओळखले जाते. ‘फ्री स्पेस क्वांटम कम्युनिकेशन’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘इस्रो’ने एक व्हिडीओ कॉन्फरन्स केली, अशी माहिती इस्रोने जाहीर केली. अहमदाबादच्या स्पेस ऍप्लिकेशन सेंटरमध्ये ही चाचणी रात्रीच्या वेळी घेण्यात आली.

ही एकप्रकारची ‘क्वांटम की डिस्ट्रीब्युशन’ (क्यूकेडी) व्यवस्था असून हे तंत्रज्ञान इस्रोने विकसित केले आहे. या यंत्रणेत शब्दबद्ध मजकूर, फोटो किंवा व्हिडीओ प्रकाश किरणांच्या सहाय्याने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचविले जातात. सध्याच्या क्रिप्टोसिस्टममध्ये अल्गोरिदमच्या आधारावर माहितीचे कोडिंग केले जाते. तेच ‘फ्री स्पेस क्वांटम कम्युनिकेशन’मध्ये भौतिकशास्त्राच्या नियमांच्या आधारे माहितीची सुरक्षा निश्‍चित केली जाते. यामुळे सॅटेलाईट डाटा कम्युनिकेशन अतिशय सुरक्षित होते, अशी माहिती इस्रोतर्फे देण्यात आली. या ‘क्वांटम क्रिप्टोग्राफी’ संदेशवहन यंत्रणेला भविष्यातील कॉम्प्युटर क्षेत्रात विकसित होणारी कोणतीही यंत्रणा भेदू शकणार नाही. त्यामुळे या यंत्रणेला ‘फ्यूचर प्रूफ’ असेही म्हटले जात आहे. या तंत्रज्ञानाद्वारे संदेशवहनाकरिता विशेष ट्रान्समिटरची, तसेच संदेश स्विकारण्यासाठी विशेष रिसिव्हरची आवश्यकता असते. हा ट्रान्समिटर आणि ‘नाविक’ नावाचा रिसिव्हर इस्रोने विकसित केला आहे.

विशेष म्हणजे इस्रोसह संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सुद्धा ‘क्वांटम की डिस्ट्रीब्युशन’ (क्यूकेडी) यंत्रणा विकसित केली आहे. डिसेंबर महिन्यात ‘डीआरडीओ’ने या तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वी चाचणी घेतली होती. यावेळी ‘डीआरडीओ’ने आपल्या हैदराबादमधील दोन प्रयोगशाळांमध्ये क्वांटम संपर्क स्थापन केला होता. त्यामुळे देशात एकाच वेळी दोन संस्थांनी ‘फ्री स्पेस क्वांटम कम्युनिकेशन’ यंत्रणा विकसित केली आहे.

अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जपान आणि चीन या जगातील ठरावीक देशांकडेच ‘फ्री स्पेस क्वांटम कम्युनिकेशन’ तंत्रज्ञान आहे. या मोजक्या देशाच्या यादीत आता भारताला स्थान मिळाले आहे.

leave a reply