उपराष्ट्रपतींच्या अरुणाचल प्रदेश भेटीवर आक्षेप घेणार्‍या चीनचे दावे भारताने धुडकावले

नवी दिल्ली/बीजिंग – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीवर चीनने घेतलेले आक्षेप भारताने धुडकावले. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भूभाग आहे, असे सांगून परराष्ट्र मंत्रालयाने चीनला चपराक लगावली. लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये पार पडलेली चर्चेची १३ वी फेरी अपयशी ठरल्यानंतर, चीन एलएसीवरील तणाव वाढविण्यासाठी कुरापती काढत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.

उपराष्ट्रपतींच्या अरुणाचल प्रदेश भेटीवर आक्षेप घेणार्‍या चीनचे दावे भारताने धुडकावलेचीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी भारताचे उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांनी अरुणाचल प्रदेशला दिलेल्या भेटीवर नाराजी व्यक्त केली. अरुणाचल प्रदेश म्हणजे दक्षिण तिबेट असून हा चीनचा भूभाग आहे, असा दावा लिजिआन यांनी केला. अशा भागात भारताच्या उपराष्ट्रपतींचा दौरा ही दोन्ही देशांमधील सीमावाद अधिकच जटील करणारी बाब ठरते. याची दखल घेऊन भारताने अशा स्वरुपाच्या कारवाया टाळाव्या, असे आवाहन लिजिआन यांनी केली. त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया नोंदविली आहे.

अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य, वेगळा न काढता येणारा भाग असून यावर भारताचा संपूर्ण अधिकार आहे. त्यामुळे चीन याबाबत करीत असलेले दावे भारत फेटाळून लावत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी स्पष्ट केले. असे आक्षेप नोंदविण्यापेक्षा चीनने लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. चीनच्या एकतर्फी कारवायांमुळे इथे तणाव निर्माण झालेला आहे, असा टोला बागची यांनी लगावला.

उपराष्ट्रपतींच्या अरुणाचल प्रदेश भेटीवर आक्षेप घेणार्‍या चीनचे दावे भारताने धुडकावलेदरम्यान, रविवारी भारत व चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये पार पडलेली चर्चेची फेरी निष्फळ ठरली होती. लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी सुचविण्यात आलेल्या रचनात्मक उपाययोजना चीनने नाकारल्याचा आरोप भारतीय लष्कराने केला आहे. तर भारतीय लष्कर चीनकडे अवाजवी मागण्या करीत असल्याचा ठपका चीनच्या लष्कराने केला आहे. या चर्चेत भारताने स्वीकारलेल्या ठाम भूमिकेमुळे अस्वस्थ झालेल्या चीनने आपल्या सरकारी मुखपत्राचा वापर करून भारताला धमक्या देण्याचे सत्र सुरू केले आहे. भारताने अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या क्वाडच्या बळावर चीनला आव्हान देण्याची तयारी केली आहे, असा आरोप चीनच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात करण्यात आला आहे.उपराष्ट्रपतींच्या अरुणाचल प्रदेश भेटीवर आक्षेप घेणार्‍या चीनचे दावे भारताने धुडकावले

मात्र भारताने अफगाणिस्तानातून माघार घेऊन आपल्या सहकार्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या अमेरिकेचा क्रूर चेहरा विसरू नये, असा इशारा चीनच्या या सरकारी मुखपत्राने दिला आहे. तसेच चीन लष्करीदृष्ट्या अधिक प्रबळ असताना देखील भारताबाबत नरमाई दाखवित असल्याचे दावे या मुखपत्राने ठोकले आहेत.

leave a reply