भारतीय अर्थव्यवस्था दमदार कामगिरी करील

- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विश्‍वास

बोस्टन – या वित्तीय वर्षात भारतीय अर्थव्यवस्था दोन आकडी विकासदराच्या जवळ पोहोचेल. तर पुढच्या वित्तीय वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर आठ टक्क्यांपर्यंत असेल, असा विश्‍वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. पुढच्या दशकभरात भारत ७.५ ते ८.५ टक्के इतक्या विकासदराने सातत्यपूर्ण प्रगती करील, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेल्या अर्थमंत्री सीतारामन यांनी जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असताना केलेले हे दावे जगाचे लक्ष वेधून घेणारे ठरतात.

भारतीय अर्थव्यवस्था दमदार कामगिरी करील - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विश्‍वासअमेरिकेतील एका विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवरील विश्‍वास व्यक्त करून पुढच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था दमदार कामगिरी करून दाखविणार असल्याचा दावा केला. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या सर्वांनी आपण करीत असलेल्या दाव्यांना दुजोरा देणारे अहवाल प्रसिद्ध केले आहेत, याकडे सीतारामन यांनी लक्ष वेधले. एकाच दिवसापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक विकासदराने प्रगती करणार असल्याचे जाहीर केले होते.

यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांना जागतिक अर्थव्यवस्थेच्या कामगिरीविषयी प्रश्‍न विचारण्यात आला. मात्र त्याबाबत निश्‍चित सांगता येणार नाही, असे स्पष्ट करून सीतारामन यांनी जगाच्या आर्थिक विकासाचे इंजिन मानले जाणार्‍या विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांची कामगिरी चांगली असेल, असे परखड मत व्यक्त केले. कोरोनाच्या साथीनंतर, आधीच्या काळात विकासाच्या मार्गावर असलेले विकसनशील देश अधिक चांगली कामगिरी करून दाखवतील असे आपल्याला वाटते, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या कामगिरीचा जागतिक अर्थव्यवस्थेलाही लाभ मिळेल, असे सीतारामन पुढे म्हणाल्या.

दरम्यान, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर नवे संकट खडे ठाकल्याचे दावे अर्थतज्ज्ञ करू लागले आहेत. जगभरातील शेअरबारांमध्ये होत असलेली घसरण त्यांची चिंता अधोरेखित करणारी बाब ठरते आहे. इंधनाची टंचाई, चीनसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने यामुळे हे जागतिक अर्थव्यवस्थेवरील संकट अधिकच तीव्र बनत असल्याचे दिसते आहे. अशा परिस्थितीत भारताची आर्थिक कामगिरी ठळकपणे जगासमोर येत असून भारताच्या विकासदराबाबत व्यक्त केले जाणारे अंदाज, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्‍वास अधिकच वाढवित आहेत. भारताच्या निर्यातीत झालेली वाढ व भारतात येत असलेल्या गुंतवणुकीत झालेली लक्षणीय वृद्धी हेच दाखवून देत आहे.

leave a reply