संघर्षबंदीवरील सहमतीचे राजकारण करणार्‍या पाकिस्तानला भारताने ‘बालाकोट’ची आठवण करून दिली

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या बालाकोट येथे ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तळावर भारताने चढविलेल्या हवाई हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांनी देशाच्या सेनादलांच्या शौर्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्‍यांची काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर संघर्षबंदीचे पालन करण्यावर सहमती झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. यासाठी तयार होऊन भारताने पाकिस्तानशी चर्चा करण्यासाठी पाऊल टाकल्याचे दावे पाकिस्तानात केले जात आहेत. मात्र भारताच्या केंद्रीय मंत्र्यांनी बालाकोटची आठवण करून देऊन पाकिस्तानला आवश्यक असलेला खरमरीत संदेश दिल्याचे दिसत आहे. सीआरपीएफच्या ४० जवानांचा बळी घेणार्‍या पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारताने पाकिस्तानच्या बालाकोट येथे जबरदस्त हवाई हल्ला चढविला होता. या हल्ल्याने पाकिस्तान हादरले होते. मात्र यात दहशतवादी नाही, तर कावळे मारले गेल्याचे हास्यास्पद दावे करून पाकिस्तानने आपली प्रतिष्ठा कायम राखण्याचा प्रयत्न केला होता. भारताच्या या हवाई हल्ल्याला दोन वर्षे झाली आहेत. पुढच्या काळात भारतात असे दहशतवादी हल्ले झाले, तर त्याला त्वरित प्रत्युत्तर मिळेल, असा संदेश भारताने पाकिस्तानला दिला होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याचा पुनरुच्चार केला. बालाकोटच्या हवाई हल्ल्याद्वारे दहशतवाद खपवून घेणार नाही, हे भारताने दाखवून दिल्याचे गृहमंत्री शहा म्हणाले. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी बालाकोटच्या हवाई हल्ल्याद्वारे भारताने दहशतवाद्यांवर कारवाईचा आपला निर्धार जगजाहीर केला, असे म्हटले आहे. देश सुरक्षित ठेवणार्‍या संरक्षणदलांचा आम्हाला अभिमान आहे, असे संरक्षणमंत्री पुढे म्हणाले.

भारत व पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्‍यांची हॉटलाईनवर चर्चा झाली असून या चर्चेत काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवर संघर्षबंदीचे पालन करण्यावर सहमती झाली. यासाठी पाकिस्तान दाखवित असलेले स्वारस्य लक्षवेधी ठरत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून भारताने आपल्याशी चर्चा सुरू करावी, यासाठी पाकिस्तान धडपडत असल्याचे उघड झाले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान व लष्करप्रमुख देखील भारताला चर्चेसाठी विनवण्या करीत होते. लडाखच्या एलएसीवर भारताने चीनसारख्या बलाढ्य देशाला माघार घेण्यास भाग पाडल्यानंतर, पाकिस्तानच्या भूमिकेत हा बदल झाल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानच्या मागणीला भारताने हा प्रतिसाद देऊन काश्मीरच्या प्रश्‍नावरील आपली चूक मान्य केल्यासारखे आहे, असे दावे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री करीत आहेत. मात्र पाकिस्तानी माध्यमे व माजी राजनैतिक अधिकारी त्यांच्या या दाव्यांवर विश्‍वास ठेवायला तयार नाही. चर्चेची तयारी दाखवून पाकिस्तान भारतासमोर झुकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, अशी हताश प्रतिक्रिया पाकिस्तानी माध्यमे व माजी राजनैतिक अधिकारी देत आहेत. काश्मीरच्या प्रश्‍नावर आता भारत म्हणेल ते पाकिस्तानला मान्य करावे लागेल, अशी टीका करून या सर्वांनी यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना धारेवर धरले आहे.

leave a reply