इस्रायलचे लष्कर इराण, हिजबुल्लाहविरोधी कारवाईसाठी तयार

- इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ

जेरूसलेम – इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी आणि प्रसंगी इस्रायल-लेबेनॉन सीमेजवळ हिजबुल्लाहच्या विरोधातील संघर्षासाठी इस्रायलचे लष्कर तयार आहे, अशी घोषणा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी केली. इराणने १७.६ किलोग्रॅम वजनाचे युरेनियम संवर्धित केल्याची चिंताजनक माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने काही तासांपूर्वीच प्रसिद्ध केली. यावर इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांची ही प्रतिक्रिया आली आहे.

यावर्षी जानेवारी महिन्यात इराणने अणुकराराचे उल्लंघन करून २० टक्क्यांपर्यंत युरेनियमचे संवर्धन करण्याची घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाची माहिती म्हणजे इराण आपल्या उद्दिष्टांच्या जवळ पोहोचत असल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर इराणच्या किमान चार अणुप्रकल्पांमध्ये युरेनियमचे पार्टिकल्स सापडल्याचा अहवालही समोर आला आहे. असे असले तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन इराणबरोबर अणुकरार करण्याच्या तयारीत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायलचे लष्कर सज्ज असल्याची घोषणा केली. तसेच इराणबरोबर अणुकरार करताना या क्षेत्रातील देशांना चर्चेत सहभागी करावे, अशी मागणी केली. तसेच अणुकरारामध्ये अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रांचा मुद्दाही असावा व या क्षेत्रातील हिजबुल्लाहसारख्या दहशतवादी संघटनांना इराणचा असलेला पाठिंबा हा देखील विचारात घ्यावा, असे गांत्झ यांनी सुचविले.

‘इराण ही क्षेत्रिय आणि जागतिक समस्या असून या इराणपासून इस्रायलला धोका आहे. तेव्हा इराणच्या विरोधात अमेरिका, युरोप आणि आखातातील इस्रायलच्या मित्रदेशांनी एकत्र यावे’, असे आवाहन गांत्झ यांनी केले. त्याचबरोबर इस्रायलला धमकावणार्‍या हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्ला यांच्या चुकीचे दु:खद परिणाम हिजबुल्लाहबरोबरच लेबेनीज जनतेलाही भोगावे लागतील. कारण हिजबुल्लाह आपल्या बचावासाठी लेबेनीज जनतेचा मानवी ढाल म्हणून वापर करीत असल्याचा आरोप संरक्षणमंत्री गांत्झ यांनी केला.

तर अमेरिका व युरोपिय देशांच्या आवाहनानंतरही आक्रमक अणुकार्यक्रम राबविणारा इराण आपले अण्वस्त्रसज्जतेचा हेतू उघड करीत असल्याचा आरोप इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनाझी यांनी केला.

leave a reply