भारत-रशिया सागरी क्षेत्रातील भागीदारी वाढविणार

- जहाजबांधणी उद्योगावर भर देण्याचे संकेत

नवी दिल्ली – भारत आणि रशिया संयुक्तरित्या जहाजबांधणी उद्योग उभारणार असून जहाजांची निर्मिती सुरू करणार आहेत. त्याचवेळी उभय देश ‘इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर'(आयएनएसटीसी) आणि ‘व्लादिवोस्तक-चेन्नई शिपिंग लिंक’ उभारुन सागरी क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याचा प्रयत्नही करणार आहेत. तसेच भारत आर्क्टिक क्षेत्रात कॉरिडॉर उभारण्याचा विचार करीत असल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबर महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात येणार आहेत. त्याआधी उभय देशांमधले हे वाढते सहकार्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

जहाजबांधणी

भारत आणि रशियामध्ये जहाजवाहतूक क्षेत्रासंर्दभात वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेबिनारला रशियाचे उद्योग आणि उप व्यापारमंत्री ‘ओल्ग रायझेनस्तव’ आणि भारताचे नौकानयन राज्यमंत्री ‘मनसुख मांडविय’ उपस्थित होते. यावेळी उभय देशांच्या नेत्यांमध्ये जहाज बांधणी, दुरुस्ती, इनलँड वॉटरवे, पोर्ट सेक्टरवर चर्चा पार पडली. या वेबिनारला रशियातील भारताचे राजदूत डी.बी. वेकंटेश वर्मा यांनी संबोधित केले. यावेळी भारत आणि रशियातील सागरी सहकार्याला वाव असल्याचे वर्मा यांनी म्हटले.

या वेबिनारमध्ये जहाजबांधणी उद्योग आणि जहाजनिर्मितीवर भर देण्यात आला. भारत आणि रशियामधील जहाजक्षेत्रातील अनेक संधी उपलब्ध आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. गेल्यावर्षी रशियामध्ये वार्षिक परिषद पार पडली होती. त्यावेळी भारत आणि रशियामधील सागरी सहकार्य वाढविण्यावर चर्चा पार पडली होती. ‘आयएनएसटीसी’ अंतर्गत, मुंबई हिंदी महासागराच्या माध्यमातून रशियाच्या सेंट पिटर्सबर्गसह इराण आणि अझरबैझानला जोडली जाईल. तसेच चेन्नई व्लादिवोस्तक शिपिंग लिंकच्या प्रस्तावही विचाराधिन असल्याचे या वेबिनारमधून सांगण्यात आले. सध्या भारतातून रशियामध्ये माल युरोपमार्गे पाठविला जातो. नव्या शिपिंग लिंकमुळे भारत-रशिया संबंध भक्कम होण्यास मदत होईल.

भारत हिंदी महासागर क्षेत्रात रशियाला सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हिंदी महासागरातील चीनच्या वाढत्या हालचाली पाहता हे या क्षेत्रातील भारत-रशिया सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. दरम्यान,भारत आर्क्टिक क्षेत्रातही गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहे. आर्क्टिक क्षेत्र नैसर्गिक खनिज आणि इंधनसंपत्तीने सम्रुध्द असल्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक भारतासाठी फायदेशीर ठरेल. भारत रशियाशी नॉर्दन सी रुटच्या माध्यमातून कनेक्ट होण्यासाठीही धडपडत आहे. या संदर्भात भारत रशियाशी चर्चा करीत आहे. तसेच आर्क्टिक क्षेत्रात संयुक्तरित्या उर्जा प्रकल्प उभारण्याची भारताने तयारी केली आहे.

leave a reply