भारत व उझबेकिस्तानमध्ये कृषी उत्पादनांच्या आयात-निर्यातीसाठी चर्चा सुरु

- उझबेकिस्तानमधील भारतीय राजदूत मनीष प्रभात

नवी दिल्ली – भारत आणि उझबेकिस्तानमध्ये कृषी उत्पादनांच्या आयात-निर्यातीसाठी चर्चा सुरू असल्याचे उझबेकिस्तानचे नवनियुक्त भारतीय राजदूत मनीष प्रभात म्हणाले. मध्य आशियाई देशांबरोबर भारताचा वार्षिक व्यापार सुमारे दोन अब्ज डॉलर्स इतका आहे. इतर देशांच्या तुलनेत ही आकडेवारी कमी दिसत असली तरी भारताचे या देशांबरोबर राजकिय व इतर क्षेत्रातील संबंध चांगले असून ते दृढ करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आयात-निर्यातीसाठी चर्चा

‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’द्वारे (एफआयसीसीआय) ‘द वे फॉरवर्ड फॉर डेव्हलपिंग इंडिया-सेंट्रल एशिया एअर कॉरिडोर’ नावाने वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये बोलताना प्रभात यांनी भारत व उझबेकिस्तानमध्ये कृषी उत्पादनांच्या आयात-निर्यातीसाठी चर्चा सुरू असल्याचेही सांगितले. मध्य आशियाई देशांबरोबर भारताचा वार्षिक व्यापार कमी आहे. मात्र व्यापार आणि राजकीय संबंध या भिन्न गोष्टी असल्याचे त्यांनी नमूद केले.

उझबेकिस्तानच नाही तर भारत व कझाकस्तानमध्येही व्यापारवाढीची शक्यता आहे. मध्य आशियाई देश भारताबरोबर हवाई वाहतुकीस वाढविण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मध्य आशियाई देश व भारतामध्ये एअर कॉरिडॉर तयार झाल्यास नागरिकांसह मालाच्या वाहतुकीसाठी हा मार्ग उपयुक्त ठरेल, असे नागरी उड्डाण मंत्रालयाच्या ज्येष्ठ आर्थिक सल्लागार वंदना अग्रवाल म्हणाल्या.

leave a reply