बुर्किना फासोतील दहशतवादी हल्ल्यात ४१ जणांचा बळी

ओआगाडौगौ – आफ्रिकेच्या बुर्किना फासोमध्ये दहशतवाद्यांनी घडविलेल्या भीषण हल्ल्यामध्ये ४१ जणांचा बळी गेला आहे. यामध्ये बुर्किना फासोच्या लष्कराला दहशतवादविरोधी कारवाईसाठी सहाय्य करणारा स्थानिक नेता व त्याच्या सहकार्‍यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बुर्किना फासोचे सरकार व लष्कराला सहाय्य करणार्‍यांना यापुढे लक्ष्य केले जाईल, अशी धमकीच दहशतवाद्यांनी दिल्याचे दिसत आहे.

बुर्किना फासोतील दहशतवादी हल्ल्यात ४१ जणांचा बळीगेल्या आठवड्यात बुर्किना फासोच्या लोरूम प्रांतात हा दहशतवादी हल्ला झाला. बुर्किना फासोच्या लष्कराला सहाय्य करणारा ‘वॉलिंटिअर्स फॉर दी डिफेन्स ऑफ द मदरलँड-व्हीडीपी’ या गटाच्या मोटारीला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. व्हीडीपीचे कार्यकते स्थानिक नेता लाजी योरो याच्यासह औहिगौया या शहराच्या दिशेने जात असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात योरो याच्यासह ४१ जणांचा बळी गेला.

बुर्किना फासोचे राष्ट्राध्यक्ष रोश मार्क क्रिस्तियान काबोरे यांनी योरो याच्या हत्येवर दु:ख व्यक्त केले. या हल्ल्यामुळे बुर्किनाची जनता दहशतवादविरोधी संघर्षातून माघार घेणार नाही, याउलट अधिक त्वेषाने लढेल, असा दावा राष्ट्राध्यक्ष काबोरे यांनी केला. बुर्किना फासोच्या सरकारने दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

पश्‍चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो हा देश काही वर्षांपूर्वी शांतीपूर्ण आफ्रिकी देश म्हणून ओळखला जात होता. पण अल कायदा आणि आयएसशी संलग्न असलेल्या दहशतवाद्यांनी या देशात आपली राजवट प्रस्थापित करण्यासाठी हल्ले सुरू केले. नोव्हेंबर महिन्यातच दहशतवाद्यांनी या देशात घडविलेल्या हल्ल्यामध्ये ५७ जणांचा बळी गेला होता.

बुर्किना फासोतील दहशतवादी हल्ल्यात ४१ जणांचा बळीआफ्रिकेचा साहेल भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या माली, बुर्किना फासो आणि नायजर या देशांमधील निमलष्करी दलांवर हे दहशतवादी हल्ले चढवित आहेत. त्याचबरोबर लष्कर व निमलष्करीदल यांना सहाय्य करणार्‍या स्थानिकांनाही हे दहशतवादी लक्ष्य करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी लोरूम प्रांतात घडलेली घटना याचाच एक भाग ठरते.

दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहभागी झालेले स्थानिक व्हीडीपीचे कार्यकर्ते मानवाधिकारांच्या उल्लंघनात सहभागी असल्याचा आरोप केला जातो. यावर संतापलेल्या बुर्किनाच्या जनतेने गेल्याच महिन्यात सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राष्ट्राध्यक्ष काबोरे यांनी पंतप्रधानांची हकालपट्टी केली होती.

दरम्यान, बुर्किना फासोतील घटनेवर इराणने चिंता व्यक्त केली आहे. काही परकीय शक्तींना बुर्किना फासोमध्ये दहशतवाद पसरवून अस्थैर्य माजवायचे आहे, असा आरोप इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खतिबझादेह यांनी केला.

leave a reply