भारताच्या सुरक्षादलांना लवकरच स्वदेशी बनावटीची ‘अँटी-ड्रोन टेक्नॉलॉजी’ मिळेल

- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

जैसलमेर – भारत स्वदेशी बनावटीचे ‘अँटी-ड्रोन’ तंत्रज्ञान विकसित करीत असून लवकरच ही यंत्रणा सीमेवर तैनात सुरक्षादलांना मिळेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केले. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये आयोजित सीमा सुरक्षादलाच्या कार्यक्रमात गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली. सीमेची सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून त्यासाठी सरकार जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यास वचनबद्ध असल्याचेही गृहमंत्री यावेळी म्हणाले.

भारताच्या सुरक्षादलांना लवकरच स्वदेशी बनावटीची ‘अँटी-ड्रोन टेक्नॉलॉजी’ मिळेल - केंद्रीय गृहमंत्री अमित शाहभारतीय सीमांच्या सुरक्षेची प्रमुख जबाबदारी असलेल्या सीमा सुरक्षादलाचा ५७वा ‘रेझिंग डे’ जैसलमेरमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. सीमा सुरक्षादलाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच त्याचा ‘रेझिंग डे’ सीमाभागात साजरा होत असल्याकडे शाह यांनी यावेळी लक्ष वेधले. यावेळी सीमा सुरक्षादलाच्या जवानांना संबोधित करताना त्यांची कामगिरी देशाच्या प्रगती व समृद्धीसाठी महत्त्वाची असल्याची जाणीव त्यांनी करून दिली.

‘देश सुरक्षित असेल तरच तो प्रगती करुन समृद्ध होऊ शकतो. सीमा सुरक्षा दल ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आहे. सीमा सुरक्षित राखून हे दल देशाची सुरक्षा निश्‍चित करीत आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला व्यासपीठ मिळवून देत आहे’, अशा शब्दात त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कार्याचा गौरव केला. त्याचवेळी या दलाला जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान मिळेल, याची ग्वाहीदेखील दिली. ‘गेल्या काही वर्षात ड्रोन्सद्वारे करण्यात येणार्‍या कारवायांचा धोका वाढताना दिसत आहे. सीमा सुरक्षादलासह डीआरडीओ व एनएसजी त्यासाठी ड्रोनविरोधी तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न करीत आहे. भारतातील वैज्ञानिकांवर आपला पूर्ण विश्‍वास असून आपण स्वदेशी बनावटीची ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित करण्यात यशस्वी होऊ याची खात्री आहे’, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.

‘२०१४ सालापासून भारत सरकारने सीमा सुरक्षित राखण्यास विशेष प्राधान्य दिले आहे. भारताच्या सीमा व त्यावर तैनात जवानांना कोणीही कमी लेखणार नाही, याची दक्षता सरकारने घेतली आहे. सीमा सुरक्षा दलातील जवानांची कमतरता भरून काढण्यासाठी ५० हजार जवानांची भरती करण्यात आली आहे. सीमाभागात उभारण्यात येणार्‍या रस्त्यांसाठीचा निधी ४४ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे’, याकडेही गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष वेधले.

leave a reply