अमेरिका व चीनच्या धोरणांचे हिंदी महासागर क्षेत्रावर परिणाम झाले

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

अबू धाबी – महासत्ता म्हणून चीनचा उदय होत असताना, अमेरिकेने हिंदी महासागर क्षेत्रातबाबत मवाळ धोरण स्वीकारले. २००८ सालापासून अमेरिकेच्या धोरणात झालेल्या या बदलाचा लाभ घेऊन चीनने आपल्या क्षमतेत वाढ केली. याचा फार मोठा प्रभाव हिंदी महासागर क्षेत्रावर पडला आहे, याची जाणीव भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी करून दिली. राजनैतिक भाषेत हा मुद्दा मांडत असताना, जयशंकर यांनी आशिया खंडात वाढत असलेल्या तणावाची पार्श्‍वभूमी नेमक्या शब्दात स्पष्ट केली. चीनच्या धोरणांमुळे आधीच्या काळातील करार व सामंजस्य याबाबत नवे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. त्याचे उत्तर येणार्‍या काळातच मिळेल, अशा सूचक शब्दात परराष्ट्रमंत्र्यांनी चीन व अमेरिकेच्या भूमिकेवर बरेच काही अवलंबून असेल, असे संकेत दिले आहेत.

अमेरिका व चीनच्या धोरणांचे हिंदी महासागर क्षेत्रावर परिणाम झाले - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर‘संयुक्त अरब अमिराती’मध्ये (युएई) आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या ‘इंडियन ओशन कॉन्फरन्स २०२१’ (आयओसी) मध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हिंदी महासागर क्षेत्रासह आशिया खंडातील परिस्थितीचा वेध घेतला. ‘२००८ सालापासून अमेरिकेच्या धोरणात्मक पवित्रा बदलला व अमेरिका अतिशय सावध भूमिका घेऊ लागली. आपल्या विस्ताराचे दुष्परिणाम टाळण्यासाठी अमेरिकेने स्वीकारलेली ही भूमिका वास्तववादी होती. पण त्याचे परिणाम हिंदी महासागर क्षेत्रावर झाले’, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. अमेरिकेने आपल्या धोरणात हे बचावात्मक बदल केले, असे जयशंकर सुचवित आहेत. बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर, त्यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांबरोबर सहकार्य वाढविण्याची घोषणा केली होती. मात्र अमेरिकन नौदलाचे या क्षेत्रातील वर्चस्व त्यांच्याच कार्यकाळात कमी झाले. याचा लाभ चीनने घेतला व इंडो-पॅसिफिक क्षेत्रात विस्तारवादी धोरण स्वीकारून वर्चस्व गाजविण्याची सुरूवात केली होती. २००८ सालापासून अमेरिकेच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या पोकळीचा चीनने लाभ घेतला, ही बाब भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी राजनैतिक भाषेत ‘आयओसी’मधील आपल्या भाषणात मांडली. त्याचवेळी चीनच्या सामर्थ्यात झालेल्या वाढीचे परिणाम हिंदी महासागर क्षेत्रासह संपूर्ण आशिया खंडातही दिसू लागले आहेत, याकडे एस. जयशंकर यांनी लक्ष वेधले.

आशियातील तणाव वाढत चालला आहे. आधीच्या काळात केलेले करार व सामंजस्य यांना तड जात असून याबाबत नवे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. याची उत्तरे इतक्यात मिळणार नाहीत. पुढच्या काळातच या प्रश्‍नांची उत्तरे मिळतील, असे सांगून जयशंकर यांनी हा तणाव आणखी बराच काळ कायम राहणार असल्याचा इशारा दिला. विशेषतः महासत्ता म्हणून चीनचा होत असलेला उदय ही विलक्षण बाब ठरते. याआधी सोव्हिएत रशिया या महासत्तेचाही अशारितीने उदय झाला होता. पण आजचा चीन जसा जागतिक अर्थकारणाचे केंद्र बनलेला आहे, ते स्थान सोव्हिएत रशियाला मिळाले नव्हते, हे जयशंकर यांनी लक्षात आणून दिले.

जागतिकीकरणाच्या युगात, वाहतुकीचे स्वातंत्र्य, हवाई मार्ग खुले असणे व अबाधित व्यापार अतिशय महत्त्वाचा ठरतो. याबरोबरच कुठल्याही स्वरुपाचे वाद कायद्याच्या चौकटीतच सोडविणे अनिवार्य बाब ठरते, असे सांगून भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे चीनला लक्ष्य केले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वर्चस्ववादी कारवायांद्वारे चीन आंतरराष्ट्रीय व्यापार धोक्यात आणत असल्याची टीका होत आहे. थेट उल्लेख टाळून आंतरराष्ट्रीय कायदे पाळण्यास नकार देणार्‍या चीनमुळे या समस्या उद्भवत असल्याचा ठपका जयशंकर यांनी ठेवल्याचे दिसते. याबरोबरच अफगाणिस्तानातून एकाएकी सैन्यमाघार घेणार्‍या अमेरिकेलाही भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी खडे बोल सुनावले. अमेरिकेच्या या सैन्यमाघारीमुळे तसेच कोरोनाच्या साथीमुळे हिंदी महासागर क्षेत्रातील अनिश्‍चिततेमध्ये अधिकच भर पडल्याचा दावा जयशंकर यांनी केला. विशेषतः आरोग्य व आर्थिक क्षेत्रावर याचे विपरित परिणाम झालेले आहेत, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले.

leave a reply