दोन-तीन वर्षातच भारत-युएई व्यापार 100 अब्ज डॉलर्सवर जाईल

- युएईच्या व्यापारमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली – संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) व्यापारमंत्री थानी बिन अहमद अल झेओदी भारताच्या भेटीवर आहेत. त्यांची व्यापारमंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा पार पडली. यावेळी पुढच्या दोन ते तीन वर्षातच भारताचा युएईबरोबरील व्यापार 100 अब्ज डॉलर्सवर जाईल, असा विश्वास युएईच्या व्यापारंमत्र्यांनी व्यक्त केला. तर भारताची युपीआय पेमेंट सिस्टीम युएईमध्ये कार्यरत झाली आहे, असे सांगून व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी पुढच्या काळात दोन्ही देशांमधील सहकार्य नवी उंची गाठेल, असे म्हटले आहे.

1 मे 2022 रोजी भारत व युएईमध्ये व्यापक मुक्त व्यापारी करार संपन्न झाला. त्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापाराला प्रचंड प्रमाणात चालना मिळाल्याचे दिसत आहे. दोन्ही देशांनी पुढच्या पाच वर्षात 100 अब्ज डॉलर्सच्या द्विपक्षीय व्यापाराचे ध्येय गाठण्याची घोषणा केली होती. पण मुक्त व्यापारी करारानंतर उभय देशांमधील व्यापाराला मिळालेली गती पाहता, हे 100 अब्ज व्यापाराचे ध्येय वेळेआधीच गाठता येईल, असा विश्वास युएईच्या व्यापारमंत्र्यांनी व्यक्त केला.

पुढच्या दोन ते तीन वर्षातच भारत व युएईमधील व्यापार 100 अब्ज डॉलर्सवर जाऊ शकतो, असे युएईचे व्यापारमंत्री थानी बिन अहमद अल झेओदी म्हणाले. सध्या दोन्ही देशांमधील व्यापारात इंधनाचा हिस्सा सुमारे 62 टक्के इतका आहे. पण मुक्त व्यापारी करारामुळे इंधनाच्या व्यतिरिक्त उभय देशांमधील व्यापाराला चालना मिळेल आणि पुढच्या काही वर्षातच परिस्थिती बदलेल, असा विश्वास अल झेओदी यांनी व्यक्त केला आहे.

leave a reply