पाश्चिमात्यांनी भारताला नकार देऊन पाकिस्तानी हुकूमशहांना शस्त्रे पुरविली

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

कॅनबेरा – पाकिस्तानच्या हवाई दलातील ‘एफ-16’ विमानांसाठी 45 कोटी डॉलर्सचे पॅकेज पुरविणाऱ्या अमेरिकेला भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आणखी एकवार खडसावले आहे. आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी थेट नामोल्लेख टाळून आजवर अमेरिकेने पाकिस्तानातील हुकूमशहांना शस्त्रास्त्रे पुरविण्याचा निर्णय घेतला होता, याची आठवण करून दिली. अमेरिकेच्या या धोरणांमुळेच भारताला रशियाकडून मिळणाऱ्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून रहावे लागले, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली. रशियाबरोबरील हे सहकार्य भारताच्या हितसंबंधांसाठी उपकारक ठरले, असा टोला देखील परराष्ट्रमंत्र्यांनी लगावला.

परराष्ट्रमंत्री जयशंकर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांच्यासह पत्रकार परिषदेला संबोधित करताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारताच्या रशियाबरोबरील संरक्षणविषयक सहकार्याची पार्श्वभूमी नेमक्या शब्दात मांडली. भारताने मागणी केलेली शस्त्रास्त्रे न पुरवता पाश्चिमात्य देशांनी भारताच्या शेजारील देशातील हुकूमशहांना शस्त्रास्त्रे पुरविली. त्या काळात भारताला रशियाकडून मिळणाऱ्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून रहावे लागले होते. त्यामुळे भारताच्या रशियाबरोबरील संरक्षणविषयक भागीदारीला पाश्चिमात्य देश जबाबदार आहेत, असे सांगून जयशंकर यांनी अमेरिकेला पुन्हा एकदा आरसा दाखविला आहे. काही दिवसांपूर्वी जयशंकर यांनी जवळपास अशाच शब्दात अमेरिकेच्या धोरणावर टीका केली होती.

अमेरिकेने पाकिस्तानच्या हवाई दलातील एफ-16 विमानांसाठी सुमारे 45 कोटी डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले होते. पाकिस्तानाला पुरविले जाणारे हे सहाय्य भारतविरोधी नसल्याचा निर्वाळा अमेरिकेने दिला होता. तर दहशतवाद्यांविरोधात या विमानांचा वापर केला जाईल, भारताच्या विरोधात नाही, असे हास्यास्पद दावे देखील अमेरिकेने केले होते. मात्र असल्या दाव्यांनी अमेरिका भारताला मूर्ख बनवू शकणार नाही, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेला बजावले होते.

पाकिस्तानला एफ-16 विमाने अद्ययावत करण्यासाठी अमेरिका करीत असलेले सहाय्य म्हणजे अमेरिकेने भारताला दिलेला इशारा असल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत. केवळ एफ-16 विमानेच नाही, तर पाकिस्तानव्याप्त काश्मीरला अमेरिकेच्या राजदूतांनी दिलेली भेट व या भूभागाचा आझाद काश्मीर असा केलेला उल्लेख, हे देखील अमेरिकेने स्वीकारलेल्या भारतविरोधी धोरणांचा भाग मानला जात आहे. त्यानंतरच्या काळात अमेरिकेने पाकिस्तानातील आपल्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल ॲडव्हायझरी लागू करून भारत देखील अमेरिकन नागरिकांसाठी धोकादायक बनल्याचा दावा केला होता. अशारितीने पाकिस्तानसह भारताला एकाच श्रेणीत टाकून अमेरिका भारताला धडा शिकवू पाहत आहे. भारत रशियाकडून इंधनाची खरेदी करीत आहे तसेच रशियाबरोबर रुपया-रूबलमध्ये व्यवहार करीत आहे. ही बाब अमेरिकेला खटकत आहे.

भारताच्या परराष्ट्र धोरणाचे सार्वभौमत्त्व म्हणजे अमेरिकाविरोध ठरतो, असा समज बायडेन प्रशासनाने करून घेतला आहे. यासाठी भारतविरोधी निर्णय घेण्याचा सपाटा बायडेन प्रशासनाने लावला असून पुढच्या काळात बायडेन प्रशासनाकडून भारताच्या विरोधात आणखी काही पावले उचलली जाऊ शकतील, असे संकेत मिळत आहेत. यावर भारताकडून प्रतिक्रिया येत असून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियामधील पत्रकार परिषदेत अमेरिकेला स्पष्ट शब्दात भारताच्या नाराजीची जाणीव करून दिली. लोकशाहीवादी भारताला शस्त्रास्त्रे पुरविण्याऐवजी, पाकिस्तानसारख्या दहशतवादासाठी कुख्यात असलेल्या देशाला शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या आघाडीवर सहाय्य करणाऱ्या अमेरिकेच्या धोरणातील विसंगतीवर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या पत्रकार परिषदेत नेमक्या शब्दात बोट ठेवले आहे.

परराष्ट्रमंत्र्यांचा कॅनडालाही सज्जड इशारा

लोकशाहीत मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा हिंसक व कट्टरवादी शक्ती गैरफायदा घेणार नाहीत, यासाठी सावध रहायला हवे, असे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी कॅनडाला बजावले आहे. भारताचे विघटन करू पाहणाऱ्या खलिस्तानवाद्यांना कॅनडामध्ये मोकळे रान दिले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी कॅनडाला हा इशारा दिला.

कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी आपली अनेकवार चर्चा झाली व हा मुद्दा आपण त्यांच्याकडे वेळोवेळी उपस्थित केला होता. हिंसा व कट्टरवादाचा पुरस्कार करणाऱ्या विघटनवादी शक्तींना लोकशाहीत मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा गैरवापर करण्याची संधी मिळता कामा नये, असे आवाहन आपण कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांना केले होते, अशी माहिती जयशंकर यांनी कॅनबेरा येथील पत्रकार परिषदेत दिली.

आपल्या देशातील लोकशाही उत्तमरित्या काम करीत आहे, याकडे लक्ष देण्याबरोबरच इतर देशातील लोकशाहीला आपल्या देशातून आव्हान मिळणार नाही, याचीही जबाबदारी आपण घ्यायला हवी’, अशा शब्दात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी कॅनडाला फटकारले. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी कॅनडातील वोट बँकेवर डोळा ठेवून काहीजण भारतातील विघटनवादी शक्तींना खतपणी घालत असल्याची टीका केली होती. पण तुमचे अंतर्गत राजकारण तुमच्यापर्यंत ठेवा, भारताला याची झळ बसता कामा नये, असे आपण कॅनडाच्या नेत्यांना बजावले होते, अशी माहिती जयशंकर यांनी या कार्यक्रमात दिली होती.

leave a reply