काकरापार येथील ‘मेक इन इंडिया’ अणुभट्टी ऊर्जा निर्मितीसाठी सज्ज

- पंतप्रधानांकडून वैज्ञानिकांचे अभिनंदन

श्रीनगर – गुजरातच्या काकरापार येथील अणुऊर्जा प्रकल्पातील तिसरी अणुभट्टी ऊर्जा निर्मितीसाठी सज्ज झाली आहे. स्वदेशी अणुऊर्जा तंत्रज्ञाचा वापर करून उभारण्यात आलेली अणुभट्टी ‘क्रिटिकल’ टप्प्यापर्यंत पोहोचणे मोठे यश मानले जात आहे. यामुळे अणुऊर्जा तंत्रज्ञान असलेल्या मोजक्या देशांच्या यादीत भारताला स्थान मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. तर गृहमंत्री अमित शहा यांनी हा भारतीय अणुशक्ती क्षेत्रासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे.

Make-In-Indiaकाकरापार अणुऊर्जा संयंत्र-३ (केएपीपी-३) कार्यरत होण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचली आहे. याला ‘क्रिटिकल’ टप्पा म्हणून ओळखले जाते. ७०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीची क्षमता असलेली ही अणुभट्टी भारतातील देशी तंत्रज्ञावर आधारित सर्वात मोठी अणुभट्टी आहे. ही अणुभट्टी म्हणजे ‘मेक इन इंडिया‘चे ठळक उदाहरण ठरते, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. भविष्यातील यशाकडे वाटचाल सुरु झाल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

काकरापार अणुऊर्जा प्रकल्पात २२० मेगावॅटची दोन संयंत्र अनुक्रमे १९९३ आणि १९९५ रोजी कार्यरत झाली होती. आता तिसरी आणि चौथी अणुभट्टी येथे उभारण्यात येत आहे. ‘केएपीपी-३’ अणुभट्या स्वदेशी अणुऊर्जा तंत्रज्ञावर आधारित आहेत. ‘न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने (एनपीसीआयएल) हे अणुभट्टी तंत्रज्ञान विकसित केले आहे. ‘केएपीपी-३’ हे ‘क्लोज्ड फ्यूल साइकल’वर आधारित त्रिस्तरीय तंत्रज्ञान आहे. लवकरच या प्रकल्पातून ऊर्जा निर्मिती सुरु होईल. यानंतर ‘केएपीपी-४’ ही लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. हे ‘प्रेशराइज्ड हेवी वाटर रिऍक्टर’ आहे.

भारताने १७५ गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा लक्ष्य ठेवले आहे. सौर, पवनशक्ती आणि अणुऊर्जेतून ते साध्य करण्यात येणार आहे. भारतात एकूण ९ हजार मेगावॅटच्या सुमारे १२ अणुभट्यां तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ६,७०० मेगावॅटच्या ९ अणुभट्यांचे काम सध्या सुरु आहे. तर महाराष्ट्रातील जैतापूर, आंध्रप्रदेशातील कोवाडा, गुजरातमधील मिठी विर्दी, पश्चिम बंगालमधील हरिपूर आणि मध्य प्रदेशातील भीमपूर येथील अणु प्रकल्पांना तात्विक मान्यता सरकारकडून मिळालेली आहे.

leave a reply