‘डेप्सांग’मधील जवानांच्या तैनातीवरून भारताने चीनला बजावले

नवी दिल्ली – ‘डेप्सांग’मधून जवानांना मागे घ्या, सुरु असलेली बांधकामे थांबवा. चिनी जवान मागे हटत नाहीत. तोपर्यंत भारतही आपली सैन्य तैनाती कमी करणार नाही, असे भारताकडून चीनला पुन्हा एकदा बजाविण्यात आले आहे. शनिवारी लडाखच्या ‘दौलत बेग ओल्डी’ (डीबीओ) येथे दोन्ही देशांमध्ये मेजर जनरल स्तरावरील चर्चा पार पडली . यामध्ये ‘डेप्सांग’ आणि ‘पॅंगोन्ग त्सो’सह इतर ठिकाणाहून चीनने आपले जवान मागे घेण्याचा मुद्दा भारताने पुन्हा उपस्थित केला. विशेषतः ‘डेप्सांग’वरून तणाव अधिक असल्याच्या बातम्या येत आहेत.

'डेप्सांग'

सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमधील मेजर जनरल स्तरावरील चर्चा शनिवारी रात्री संपली. या चर्चेतूनही काही निष्पन्न झाले नसल्याच्या बातम्या येत आहे. याबाबतचे तपशील लष्कराकडून जाहीर करण्यात आले नसले, तरी भारताने पुन्हा एकदा चीनला जवानांना मागे घ्या असे स्पष्ट शब्दात बजावल्याचे सांगितले जाते. भारताकडून ३ इन्फन्ट्री डिव्हिजनचे मेजर जनरल अभिजित बापट भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत होते.

‘डेप्सांग’मधील चीनच्या तैनाती आणि सुरु असलेल्या बंधकामांवर भारताने आक्षेप घेतला आहे. उत्तर लडाखमधील पॉईंट १० आणि १३ मध्ये गस्त घालण्यास चीन भारताला रोखू पाहत आहे. या दोन्ही गस्ती पॉईंटला जोडणारा मार्ग ‘डेप्सांग’मधून जात असून ‘डेप्सांग’मध्ये तैनाती वाढवून चीन भारताला येथे गस्तीपासून रोखत असला, तरी भारतानेही या भागात तैनाती वाढवून चीनला संदेश दिला आहे. उत्तर लडाखमधील ‘डेप्सांग’चा भाग सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा असल्याने भारताकडून येथून चिनी  सैनिकांना मागे ढकलण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याच्या बातम्या आहेत.

दरम्यान चीनच्या हालचाली पाहता भारताने इथे दीर्घ काळ तैनातीची तयारी केली आहेत. लडाख बरोबर अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि हिमाचलमध्ये अतिरिक्त सैन्य तैनाती कायम ठेवण्यात येणार आहे.

leave a reply