केरळमधील भूस्खलनातील बळींची संख्या ४२ वर

Keral-Landslideतिरुवनंतपुरम – केरळमधल्या भूस्खलनात बळी गेलेल्यांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. रविवारी ढिगाऱ्यातून १६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अद्याप ३० जण बेपत्ता असून बचावकार्य वेगाने सुरु आहे. रविवारी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच केरळमध्ये पावसाचा जोर वाढला असून काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

शुक्रवारी मुसळधार पावसामुळे केरळच्या इडुकी जिल्ह्यातल्या राजामलाई इथे चहाच्या लागवडीच्या मळ्याजवळ भूस्खलनाची घटना घडली. दोन दिवस झाले तरी येथील बचावकार्य सुरु आहे. रविवारपर्यंत या दुर्घटनेतल्या बळींची संख्या ४२ वर पोहोचली आहे. अद्याप ३० जण बेपत्ता आहेत. अतिवृष्टी आणि खराब हवामानामुळे अडचणी येत आहेत.

Keral-Landslideदरम्यान, केरळमध्ये सतत मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांंडली आहे. त्यात रविवारी पंबा धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे केरळचा धोका वाढला आहे. त्यामुळे यंत्रणा हायअलर्टवर आहे. पुढील २४ तासात केरळमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. केरळच्या अल्लापुझा, इडुक्की, मल्ल्लापुरम, वायनाड, कोझिकोड, कन्नुर, कसारगोड या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

leave a reply