तालिबानच्या संघर्षबंदीचे भारताकडून स्वागत

नवी दिल्ली – ईदच्या काळात तालिबानने अफगाणी सरकारबरोबर तीन दिवसांच्या संघर्षबंदीची घोषणा केली आहे. अफगाणी सरकारने देखील हा प्रस्ताव स्वीकारला असून राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी अफगाणी जवानांना तालिबानवर हल्ला न चढविण्याचे आदेश दिले आहेत. तालिबानने केलेल्या या संघर्षबंदीचे भारताने स्वागत केले असून हा संघर्ष बंदीचा कालावधी वाढवा असे आवाहन केले आहे.

ईदच्या काळात तीन दिवसांसाठी तालिबान अफगाणिस्तानात हल्ले चढविणार नाही. केवळ आपल्यावरील हल्ल्यांना प्रत्युत्तर देईल, असे तालिबानने जाहीर केले होते. या पार्श्‍वभूमीवर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी अफगाणी सैन्याला तालिबानवरील हल्ले थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अफगाणी सरकार व तालिबान मधील ही संघर्षबंदी यशस्वी ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याआधी इस्लामधर्मियांसाठी पवित्र असलेल्या रमजानच्या महिन्यात अफगाणिस्तानात संघर्षबंदी करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले होते. त्यामुळे ही तीन दिवसांची संघर्षबंदी अफगाणी सरकार व तालिबान मधील चर्चेला चालना देणारी ठरू शकते असे संकेत मिळत आहेत.

भारतानेही तालिबानने जाहीर केलेल्या या संघर्ष बंदीचे स्वागत केले आहे. तसेच या संघर्षबंदीचा कालावधी वाढविला जाईल अशी अपेक्षाही भारताने व्यक्त केली आहे . काही दिवसांपूर्वी तालिबानच्या एका नेत्याने काश्मीरवरून भारताला धमकी दिल्याच्या बातम्या पाकिस्तानी माध्यमांनी उचलून धरल्या होत्या. मात्र यानंतर खुलासा देऊन तालिबानने काश्मीर हा भारताचा अंतर्गत मामला असल्याचे जाहीर केले होते. तसेच भारताच्या अंतर्गत कारभारात तालिबान हस्तक्षेप करणार नाही, अशी भारताला खुश करणारी भूमिका तालिबानने घेतली होती.

मात्र तालिबानकडून आधी आलेली धमकी व त्यानंतरचा खुलासा या दोन्ही गोष्टी तालिबानच्या डावपेचाचा भाग असल्याचे दावे भारताचे सामरिक विश्लेषक करीत आहेत. अफगाणिस्तानात राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांच्या लोकनियुक्त सरकारला आपला पाठिंबा असेल असे भारताने वेळोवेळी जाहीर केले होते . अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्य माघारी नंतरही आपल्या भूमिकेत बदल होणार नाही ,अशी ग्वाही भारताने दिली होती. पण भारताने ही भूमिका बदलून तालिबानला पाठिंबा द्यावा यासाठी या संघटनेची धडपड सुरू आहे. यासाठी आपण भारताबरोबर चर्चेसाठी उत्सुक असल्याचे संकेत तालिबान देत आहे.

तालिबानशी चर्चेबाबत भारताने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. तालिबान अजूनही पाकिस्तानच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील शांतता व स्थैर्याला तालिबान कडून धोका संभवतो अशी भारताची आजवरची भूमिका आहे. तालिबानने आपल्यावरील पाकिस्तानचा प्रभाव सोडून दिला तरच तालिबानशी चर्चा शक्य असल्याचे संकेत भारतीय मुत्सद्दी देत आहेत. याला अद्याप उघडपणे तालिबानकडून प्रतिसाद मिळाला नसला तरी काश्मीरबाबत तटस्थ राहण्याचे आश्वासन देऊन तालिबान भारताचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करीत आहे. तालिबानने केलेल्या तीन दिवसांच्या संघर्ष बंदीचे स्वागत करून भारतानेही तालिबानच्या विधायक भूमिकेला भारत प्रतिसाद देईल असा संदेश दिला आहे.

leave a reply