भारतीय नौदलाचे ‘मिशन सागर’

'आयएनएस केसरी' मॉरिशसमध्ये दाखल

नवी दिल्ली/ पोर्ट लुईस – ‘मिशन सागर’अंतर्गत पाच देशांना औषधे व वैद्यकीय साहित्य घेऊन निघालेले ‘आयएनएस केसरी’ युध्दनौका शनिवारी मॉरिशसच्या पोर्ट लुईस बंदरात दाखल झाली. याआधी भारताने एअर इंडियाच्या विशेष विमानाने १३ टनांच्या औषधांसह वैद्यकीय साहित्य आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची औषधे मॉरीशसला पुरविले होते. दरम्यान भारताने पाठविलेल्या मदतीसाठी मॉरिशसच्या पंतप्रधानांनी भारताचे आभार मानले आहेत.

भारताने कोरोनाव्हायरसच्या भयंकर साथीचा सामना करीत असलेल्या हिंदी महासागरातील आपल्या शेजारी देशांसह हिंदी महासागर क्षेत्रातील मालदीव, मॉरीशस, मादागास्कर, कोमोरोस आणि सेशल्स या पाच देशांना औषधे, वैद्यकीय साहित्य यांच्यासह वैद्यकीय पथकही पाठविले आहे. भारताच्या या ‘मिशन सागर’ ची सुरुवात मालदीवपासून झाली होती. तर याच मिशन अंतर्गत पुढील टप्प्यात ‘आयएनएस केसरी’ मॉरिशसमध्ये दाखल झाले आहे.

मॉरिशसला १० टन औषधे भारताकडून पुरविण्यात आली आहेत. याशिवाय १४ सदस्यांचे विशेष वैद्यकीय पथकेही येथे दाखल झाली आहेत. यामध्ये नौदलाचे डॉक्टर आणि पॅरामेडिक्स आहेत. डॉक्टरांची ही टीम मॉरिशसच्या डॉक्टरांना कोरोनाव्हायरस आणि डेंग्यूच्या रूग्णांना तपासण्यासाठी सहाय्य करणार आहे. शनिवारी आयएनएस केसरी मॉरिशसच्या बंदरात दाखल झाल्यानंतर भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने औषधांचे बॉक्सेस मॉरिशसचे आरोग्य मंत्री डॉ. कैलास जगुतपाल यांना सुपूर्द केले.

दरम्यान कोरोनाव्हायरसची साथ रोखण्यासाठी भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा साठा पाठविल्याबद्दल मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगुनाथ यांनी सोशल मिडीयावरून भारतीय पंतप्रधानांचे आभार मानले होते. त्यावर भारताच्या पंतप्रधानांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

leave a reply