भारत एलएसीवर इस्रायलचे हेरॉन ड्रोन्स तैनात करणार

नवी दिल्ली – भारतावर दडपण टाकण्यासाठी चीनने एलएसीजवळ नव्या कुरापती सुरू केल्या आहेत. चीनच्या या हालचालींवर करडी नजर ठेवा, असे आदेश भारताच्या लष्करप्रमुखांनी काही दिवसांपूर्वीच लष्कराला दिले होते. या पार्श्‍वभूमीवर इस्रायलचे प्रगत ‘हेरॉन’ टेहळणी ड्रोन लवकरच लडाख भागात तैनात केले जातील. याशिवाय सीमेवरील गस्त अधिक मजबूत करण्यासाठी मिनी ड्रोन्सचाही वापर केला जाणार आहे. भारताने घेतलेले हे निर्णय चीनला योग्य तो संदेश देणारे ठरतात.

हेरॉनलडाख व अरुणाचल प्रदेशची एलएसी व भूतानच्या सीमेजवळ चीनच्या भारतविरोधी कुरापती थांबलेल्या नाहीत. भारतात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे आणि त्याचा फायदा घेण्यासाठी चीन एलएसीवर या कारवाया करीत असल्याचा आरोप होत आहे. मात्र चीनपासून सावध असलेल्या भारतीय सैन्याने एलएसीवरील आपली गस्त कायम ठेवली आहे. गेल्या आठवड्यात लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी अरुणाचल प्रदेश येथील लष्करी तळाला भेट दिल्यानंतर सैन्याला चीनपासून सावध राहण्याची सूचना केली होती.

एलएसीवर गस्त घालण्यासाठी भारताने याआधीच आपली टेहळणी विमाने तैनात केली आहेत. त्याचबरोबर इथली टेहळणी वाढविण्यासाठी भारतीय लष्कराने इस्रायलकडून अतिप्रगत हेरॉन ड्रोन्स मागवले आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या विशेष आर्थिक अधिकारांतर्गत लष्कराने इस्रायलकडून चार हेरॉन भाडेतत्वावर घेतले आहेत. लष्कराकडे आधीपासून असलेल्या हेरॉनच्या तुलनेत हे नवे ड्रोन्स अधिक प्रगत असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

नव्या हेरॉनमधील अँटी-जॅमिंग क्षमता आधीच्या ड्रोन्सच्या तुलनेत खूपच अधिक आहे. यामुळे लडाख व एलएसीच्या इतर भागात या ड्रोन्सची टेहळणी भारतीय लष्करासाठी फारच सहाय्यक ठरणार असल्याचा दावा केला जातो. इस्रायलकडून घेतलेल्या या हेरॉन ड्रोन्स व्यतिरिक्त भारतीय लष्कराने अमेरिकेकडूनही मिनी ड्रोन्सची खरेदी केली आहे. हे ड्रोन्स लष्कराच्या बटालियन्सना पुरविले जातील. हातानेही लाँच केले जाऊ शकणारे हे मिनी ड्रोन्स एलएसीवरील टेहळणीत लष्कराच्या क्षमतेत नक्कीच वाढ करणारे ठरतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारतीय लष्कराने इस्रायलकडून आधीच हेरॉन-टीपी ड्रोन्सची स्वतंत्र आवृत्ती खरेदी केली आहे. सुमारे 24 तास टेहळणी करण्याबरोबरच एक टन वजनाची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता या हेरॉन-टीपीमध्ये आहे. या व्यवहारामुळे भारत व इस्रायलच्या संरक्षणविषयक सहकार्याचे महत्त्व नव्याने अधोरेखित झाले आहे. चीनसारख्या बलाढ्य देशाची पर्वा न करता इस्रायलने भारताला ड्रोन्स पुरविण्याचा निर्णय घेऊन आपण भारताबरोबरील सहकार्याला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचे दाखवून दिले आहे.

गाझातील हमास व इस्लामिक जिहाद या संघटनांबरोबर इस्रायलच्या संघर्षात चीनने इस्रायलच्या विरोधात भूमिका स्वीकारली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत चीन इस्रायलविरोधी ठरावाच्या बाजूने उभा राहिला होता. तसे करून चीन आखाती देशांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. यामुळे इस्रायल भारताबरोबर करीत असलेले हे संरक्षणविषयक सहकार्य अधिकच लक्षणीय बाब ठरते आहे.

leave a reply