‘तेहरिक’वरील अपयशी ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानातील घातपातांमध्ये लक्षणीय वाढ

‘तेहरिक’बजौर – गेल्या चोवीस तासात पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा आणि बलोचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी दोन मोठे स्फोट घडविले. तर त्याआधी पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची १७ जणांचा बळी घेणार्‍या शक्तीशाली स्फोटाने हादरली होती. गॅस पाईपलाईनमधील स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याचे पाकिस्तानच्या यंत्रणा सांगत आहेत. पण पाकिस्तानच्या लष्कराने ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या दुसर्‍या क्रमांकाच्या नेत्यावर अपयशी ड्रोन हल्ला चढविल्यानंतर हे स्फोट झाल्याचे पाकिस्तानी विश्‍लेषक लक्षात आणून देत आहेत.

रविवारी पाकिस्तानच्या बजौर प्रांतात दहशतवाद्याने घडविलेल्या आत्मघाती स्फोटात दोन ठार व चार जण जखमी झाले. तर शनिवारी संध्याकाळी बलोचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील स्फोटात एका महिलेचा बळी गेला असून दहा जण जखमी झाले. या स्फोटासाठी दहशतवाद्यांनी एका मोटारसायकलवर स्फोटके पेरली होती, असा दावा केला जातो. या दोन्ही हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. पण काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या लष्कराने ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या विरोधात केलेली कारवाई या हल्ल्यांसाठी कारणीभूत असल्याचे मानले जाते.

‘तेहरिक’पाकिस्तानच्या लष्कराने गुरुवारी संध्याकाळी अफगाणिस्तानातील कुनार प्रांतात ड्रोन हल्ला चढविला होता. पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या कुनार प्रांतातील छावगाम गावात एका घरावर क्षेपणास्त्र डागले होते. या ठिकाणी ‘तेहरिक-ए-तालिबान’ या दहशतवादी संघटनेचा नेता मौलवी फकीर मोहम्मद आपल्या साथीदारांसह असल्याचा दावा पाकिस्तानी यंत्रणांनी केला होता. या क्षेपणास्त्राने सदर घराचे छप्पर छेदल्याचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले. पण या क्षेपणास्त्राचा स्फोटच झाला नाही. त्यामुळे या ड्रोन हल्ल्यातून फकीर मोहम्मद बचावल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

पाकिस्तानच्या लष्करासाठी ही फार मोठी नाचक्कीची बाब ठरली होती. पाकिस्तानच्या लष्कराने चिनी बनावटीचे हलक्या प्रतीचे ड्रोन व क्षेपणास्त्रे वापरल्याची टीका काही वृत्तवाहिन्यांनी चीनचे नाव न घेता केली. तर काही माध्यमांनी हा ड्रोन हल्ला चढवून पाकिस्तानने ‘तेहरिक-ए-तालिबान’सह अफगाणिस्तानातील तालिबानला देखील डिवचल्याचे इशारे दिले आहेत.

‘तेहरिक’ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर बगराम हवाईतळावर कैद असलेल्या दहशतवाद्यांची सुटका केली होती. यामध्ये तेहरिक तसेच आयएस-खोरासनच्या शेकडो दहशतवाद्यांचा देखील समावेश होता. मौलवी फकीर मोहम्मद देखील यापैकी एक होता. त्याच्या सुटकेवर पाकिस्तानातून जोरदार टीका झाली होती. तालिबान आणि तेहरिक, या दोन्ही वेगवेगळ्या संघटना नसून एकच असल्याचे इशारे काही पाकिस्तानी पत्रकारांनी याआधीच दिले होते.

तर काही दिवसांपूर्वी तेहरिकने पाकिस्तानबरोबरची संघर्षबंदी मोडल्यानंतर तालिबानने देखील पाकिस्तानच्या सरकारला तेहरिकच्या मागण्यांवर विचार करण्याची समज दिली होती. त्याचबरोबर पाकिस्तानातील शासनव्यवस्था आपल्याला अपेक्षित असलेली नाही, असा पाकिस्तानाला धडकी भरविणारा शेरा तालिबानने मारला होता.

अशा परिस्थितीत, पाकिस्तानच्या लष्कराने थेट अफगाणिस्तानात ड्रोन हल्ले चढवून केवळ तेहरिकच नाही तर तालिबानलाही आव्हान दिले आहे. तेहरिककडून या कारवाईला उत्तर दिले जाईलच. पण येत्या काळात तालिबानही पाकिस्तानला याची किंमत चुकती करण्यास भाग पाडेल, अशी चिंता पाकिस्तानी माध्यमे व्यक्त करीत आहेत.

leave a reply