भारत सार्वभौमत्त्वाच्या आघाडीवर तडजोड करणार नाही

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – ‘लडाखच्या एलएसीवर चीनने भारताची भूमी बळकावलेली नाही. काहीही झाले तरी भारत आपले सार्वभौमत्त्व व अखंडतेबाबत तडजोड करणार नाही. याच्या रक्षणासाठी कुठलेही मोल देण्याची भारताची तयारी आहे. गलवानच्या संघर्षात भारतीय सैनिकांनी ते सिद्ध केलेले आहे’, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संरक्षणमंत्र्यांनी चीनबरोबरील सीमावादावरील देशाची भूमिका परखडपणे मांडली.

लडाखच्या एलएसीवर घुसखोरी करून चीनने भारताचा पुन्हा एकदा विश्‍वासघात केल्याचा ठपका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ठेवला होता. त्यांच्या या विधानाला संरक्षणमंत्र्यांनी दुजोरा दिला. चीनने खरोखरच भारताच्या विश्‍वासाला धक्का दिल्याचे राजनाथ सिंग म्हणाले. मात्र काहीही झाले तरी देशाची इंचभर भूमी देखील दुसर्‍याच्या हाती पडू देणार नाही, सार्वभौमत्त्व आणि अखंडतेच्या आघाडीवर भारत अजिबात तडजोड करणार नाही, अशा शब्दात संरक्षणमंत्र्यांनी देशाला आश्‍वस्त केले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव काही संवेदनशील गोष्टींचा वाच्यता करता येऊ शकत नाही, असे सांगून याबाबतची सारी माहिती उघड करण्यास संरक्षणमंत्र्यांनी नकार दिला.

चीनने भारताची भूमी बळकावलेली आहे का, या प्रश्‍नाला उत्तर देताना राजनाथ सिंग खरे तर हा प्रश्‍न उलटा करून विचारायला हवा होता, असे मार्मिक विधान केले. त्याचवेळी भारत हा शांतीप्रिय देश असून आत्तापर्यंत भारताने दुसर्‍या देशाची इंचभरही जमीन बळकावलेली नाही, असा निर्वाळा दिला. दरम्यान, चीनबरोबरील सीमावाद सोडविण्यासाठी चर्चेची प्रक्रिया सुरू आहे आणि चर्चेद्वारे हा वाद सोडविता येऊ शकतो, असा आपल्याला विश्‍वास वाटत असल्याचे राजनाथ सिंग यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्रालयात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत चीनबरोबरील सीमावादावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी महत्त्वाचे विधान केले होते. चीनच्या एलएसीवर भारताने सुरू केलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प हे चीनच्या अस्वस्थतेचे प्रमुख कारण ठरले आहे, असे यावेळी जयशंकर म्हणाले होते. या अस्वस्थतेमुळेच चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा दावा परराष्ट्रमंत्र्यांनी केला होता. मात्र यानंतरही भारताने एलएसीवरील पायाभूत सुविधांचे विकासप्रकल्प राबविण्याचा धडका सुरू ठेवलेला आहे, याकडे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्ष वेधले.

पुढच्या काळातही भारत एलएसीवरील पायाभूत सुविधांचा विकास करून इथल्या सीमेची सुरक्षा निश्‍चित करीत आहे. ही बाब चीनला खटकत असली तरी भारताला रोखण्यासाठी चीनने केलेले सारे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. लडाखच्या एलएसीवर चीनचे जवान समोर असताना, भारतीय सैनिकांनी काही पुलांचे बांधकाम पूर्ण केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

leave a reply