नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडून २४ तासात ट्रम्प यांचे निर्णय उलट फिरविणारे नऊ अध्यादेश जारी

वॉशिंग्टन – बुधवारी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यानंतर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तातडीने पदाची सूत्रे हाती घेतली. गेल्या २४ तासात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सुमारे १७ अध्यादेश जारी केले असून, त्यात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्त्वाचे निर्णय फिरविणार्‍या नऊ अध्यादेशांचा समावेश आहे. बायडेन प्रशासनाने ‘पॅरिस हवामान करार’ व ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’मध्ये अमेरिकेचा पुन्हा एकदा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी स्थलांतरण, मेक्सिको वॉल तसेच इंधनवाहिनीसंदर्भात घेतलेले निर्णयही रद्द केले आहेत.

डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन व कमला हॅरिस यांनी बुधवारी अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्षा म्हणून शपथ घेतली. बायडेन यांनी यापूर्वी २००८ ते २०१६ या कालावधीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तर ५६ वर्षीय कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. भारत, ब्रिटन, जर्मनी, रशिया, चीन यांच्यासह अनेक देशांनी बायडेन व हॅरिस जोडीचे अभिनंदन केले आहे. भारताकडून उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडेन यांचे अभिनंदन करणारा संदेश सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हा ब्रिटन व अमेरिकेसाठी मोठा क्षण असल्याचे म्हटले आहे. जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी नवे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याबरोबर राजकीय सामंजस्यासाठी वाव असल्याचा उल्लेख केला आहे. युरोपिय महासंघाच्या प्रमुख उर्सुला व्हॉन डर लेयन यांनी, ‘द युनायटेड स्टेटस् इज बॅक’ अशी प्रतिक्रिया नोंदविली आहे. रशियाचे अमेरिकेतील राजदूत अ‍ॅनातोली अ‍ॅन्टोनोव्ह यांनी रशिया-अमेरिका संबंधांमध्ये नवा अध्याय सुरू झाल्याचे मत मांडले आहे. आता पुढील काळात अमेरिका व चीनमध्ये चांगले संबंध असावेत, अशी इच्छा असणारे दूत वाईट शक्तींना पराभूत करतील, असे चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी म्हटले आहे.

शपथविधी सोहळ्यादरम्यान केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी, हा दिवस लोकशाहीचा, अमेरिकेचा व नव्या आशेचा असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी अमेरिकेत सुरू असलेल्या कोरोना साथीच्या हाहाकारावरून जनतेला सावधगिरीचा इशाराही दिला. पुढे येणारा काळ अमेरिकी जनतेसाठी ‘डार्क विंटर’ असून या काळाला तोंड देण्यासाठी सर्वांनी आपली शक्ती राखून ठेवावी, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले. पुढील कालावधी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक कठोर व घातक काळ असणार आहे, असेही त्यांनी बजावले. दरम्यान, शपथविधीनंतर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तातडीने पदाची सूत्रे हाती घेतली. गेल्या २४ तासांमध्ये बायडेन यांनी तब्बल १७ अध्यादेशांवर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. यातील नऊ अध्यादेश अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय उलट फिरविणारे आहेत. त्यात मेक्सिको सीमेवर सुरू असलेले ‘बॉर्डर वॉल’चे काम ताबडतोब थांबविणे, सात देशांमधील नागरिकांवर असलेली प्रवेशबंदी उठविणे व निर्वासितांविरोधातील व्यापक कारवाई रोखणे यांचा समावेश आहे.

त्याचवेळी अमेरिकेतील नव्या प्रशासनाने ‘पॅरिस हवामान करारा’त पुन्हा सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची प्रक्रियाही थांबविण्यात आली आहे. अमेरिकेत होणार्‍या जनगणनेत नागरिक नसलेल्यांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेच्या इंधनक्षेत्रासाठी महत्त्वाच्या ठरणार्‍या ‘कीस्टोन पाईपलाईन’ला दिलेली मान्यताही काढून घेण्यात आली आहे. येत्या काही दिवसात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून ट्रम्प यांचे अनेक निर्णय उलट फिरविण्यात येतील, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात आले आहे.

leave a reply