भारत-फ्रान्सच्या वायुसेनेचा ‘डेझर्ट नाईट’ युद्धसराव

जोधपूर – राजस्थानच्या जोधपूरमध्ये भारत आणि फ्रान्सच्या वायुसेेनेचा ‘डेझर्ट नाईट २०२१’ युद्धसराव सुरू झाला आहे. या युद्धसरावात वायुसेनेच्या ताफ्यात काही महिन्यांपूर्वीच आलेल्या ‘रफायल’ लढाऊ विमानांचा समावेश आहे. रफायलचे प्रशिक्षण घेऊन त्याचा वापर करण्याचे कौशल्य वायुसेनेच्या वैमानिकांनी अल्पावधीत आत्मसात केले व आपली क्षमता सिद्ध केली, असे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले आहे.

बुधवारपासून राजस्थानच्या जोधपूरमध्ये भारत-फ्रान्सच्या वायुसेनेचा हा युद्धसराव सुरू झाला असून रविवारपर्यंत हा सराव सुरू असेल. संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत या सरावासाठी उपस्थित होते. सदर सरावात भारतीय वायुसेनेची रफायल, सुखोई-३० आणि मिराज विमाने सहभागी झाली आहेत. यापैकी फ्रान्सकडूनच खरेदी केलेली रफायल लढाऊ विमाने काही महिन्यांपूर्वी भारतीय वायुसेनेत दाखल झाली होती. मात्र वायुसेनेच्या वैमानिकांनी अल्पावधीत या विमानांचे कौशल्य आत्मसात केले व आपली क्षमता सिद्ध केली. रफायलच्या समावेशामुळे भारतीय वायुसेना जगातील अग्रगण्य हवाई दलांच्या श्रेणीत पोहोचली आहे, असा विश्‍वास यावेळी जनरल रावत यांनी व्यक्त केला.

२००२ सालापासून भारत व फ्रान्समध्ये हवाई सरावाचे आयोजन केले जाते. पण यावर्षीच्या सरावामध्ये भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांचे कौशल्य अधिक प्रकर्षाने समोर आले. भारतीय वैमानिक कुठल्याही अत्याधुनिक विमानाचे अत्यंत कमी काळात प्रशिक्षण घेऊन त्याचा वापर करू शकतात, हे यामुळे सिद्ध झाले, असे सांगून संरक्षणदलप्रमुखांनी त्यावर समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर या सरावात सहभागी झालेल्या फ्रान्सच्या ‘एमआरटीटी’ या वाहतूक करणार्‍या बहुउद्देशिय विमानाची संरक्षणदलप्रमुखांनी प्रशंसा केली.

‘एमआरटीटी’ हे बहुउद्देशिय विमान असून याद्वारे वाहतूक करता येते, हवेतल्या हवेत इतर विमानांमध्ये इंधन भरता येते आणि आवश्यकता भासल्यास या विमानाचा इमर्जन्सी हॉस्पिटलसारखाही वापर केला जाऊ शकतो, असे जनरल रावत म्हणाले. या हवाई सरावात भारतीय वायुसेनेच्या सुखोई व मिराज विमानांमध्ये हवेतल्या हवेत इंधन भरण्याचे काम ‘एमआरटीटी’ द्वारे करण्यात आले, अशी माहिती संरक्षणदलप्रमुखांनी दिली. थेटपणे उल्लेख केलेला नसला तरी या विमानांच्या खरेदीसाठी भारत उत्सुक असल्याचे संकेत जनरल रावत यांच्या विधानातून मिळत आहेत.

दरम्यान, भारत व फ्रान्सचे सामरिक तसेच संरक्षणविषयक सहकार्य अधिकाधिक दृढ बनत चालल्याचे या हवाई युद्धसरावामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. भारत फ्रान्सकडून आणखी ३६ रफायल विमाने खरेदी करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या काही काळापूर्वी समोर आल्या होत्या. अधिकृत पातळीवर याबाबतची घोषणा झालेली नसली तरी भारतीय वायुसेनेला भासत असलेल्या लढाऊ विमानांची कमतरता रफायल सारख्या अत्याधुनिक विमानांची संख्या वाढवून दूर करता येईल, असे वायुसेनेचे माजी अधिकारी सांगत आहेत.

भारताने शंभराहून अधिक रफायल विमानांची खरेदी केली तर त्यासाठी भारतातच रफायलच्या निर्मितीचा प्रकल्प राबविण्याची तयारी फ्रान्सने दाखविली आहे. यासाठी रफायलच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतर करण्यासाठी फ्रान्स तयार आहे. तसेच भारतात निर्मिती केल्या जाणार्‍या रफायलच्या ७० टक्के इतक्या प्रमाणात सुट्टे भाग भारतातच तयार केले जातील, असा प्रस्ताव फ्रान्सने दिला आहे. याबरोबरच भारताने विकसित केलेल्या तेजसच्या पुढच्या आवृत्तीसाठी फ्रान्स सहाय्य करण्यास तयार असल्याचे देखील दावे केले जात होते.

leave a reply