ऐतिहासिक संबंध असलेल्या अफगाणिस्तानच्या मागे भारत ठामपणे उभा राहिल

- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल

अजित डोवलदुशांबे – अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर या देशावरील भारताचा प्रभाव संपुष्टात येईल, असे दावे करणाऱ्या पाकिस्तानला फार मोठे धक्के बसू लागले आहे. तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधला सीमावाद पेटला असून यावरून संघर्ष भडकण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. त्याचवेळी तालिबानने अफगाणी जनतेसाठी सहाय्य पाठविणाऱ्या भारताशी सहकार्य प्रस्थापित करण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर, ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या ‘रिजनल सिक्युरिटी डायलॉग ऑन अफगानिस्तान’मध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचा सहभाग व इथे पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली.

भारताचे अफगाणिस्तानशी ऐतिहासिक संबंध आहेत. अफगाणी जनतेच्या पाठिशी भारत नेहमीच उभा राहिला. अफगाणिस्तानच्या हिताशी भारताचा निकटतम संबंध आहे व कुणीही ही बाब बदलू शकणार नाही, अशा शब्दात अजित डोवल यांनी भारताच्याअफगाणिस्तानबरोबरील संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले. याबरोबरच दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची अफगाणिस्तानची क्षमता वाढविण्याची आवश्यकता असल्याचे उद्गार यावेळी डोवल यांनी काढले. या क्षेत्राच्या शांती व सुरक्षेसाठी अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांवरील कारवाई महत्त्वाची ठरते, याची जाणीव यावेळी डोवल यांनी दुशांबे येथील या परिषदेत करून दिली आहे.

अफगाणिस्तानातून दहशतवाद्यांना इतर देशांमध्ये विस्तार करण्याची संधी मिळता कामा नये, यासाठी भारताने याआधीही ठाम भूमिका घेतली होती. तालिबाननेही अफगाणिस्तानचा वापर इतर देशांमध्ये दहशतवादी कारवायांसाठी होऊ देणार नाही, असे जाहीर केले होते. दरम्यान, ‘अफगाणिस्तानात मानवी जीवनाचा सन्मान व्हावा. अल्पसंख्यांक व महिलांना अधिकार मिळावे. मुलांसह मुलींनाही शिक्षणाचा अधिकार मिळावा, ही भारताची अपेक्षा असल्याचे डोवल यांनी यावेळी स्पष्ट केले. महिलांना काम करण्याचा अधिकार मिळाला तर अफगाणिस्तानातील उत्पादकता वाढेल आणि त्याचा फार मोठा लाभ या देशाला मिळेल. यामुळे युवावर्गावरील कट्टरवादाचा प्रभाव कमी होईल’, असा विश्वास अजित डोवल यांनी व्यक्त केला.

तसेच अफगाणिस्तानाला पुरविले जाणारे सहाय्य कुठलाही पक्षपात न करता सर्वांना मिळावे, अशी मागणीही यावेळी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी केली. अफगाणिस्तानला भयंकर उपासमारीचे संकट भेडसावत असून या देशातील मुलांना याचा सर्वाधिक फटका बसेल, असा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाने नुकताच प्रसिद्ध केला होता. त्याच्या आधीच भारताने अफगाणिस्तानला सुमारे 50 हजार मेट्रिक टन इतका गहू निर्यात करण्याची घोषणा केली आहे. यापैकी 17 हजार मेट्रिक टन इतका गहू याआधीच अफगाणिस्तानात पोहोचविण्यात आला आहे.

याबरोबरच कोरोनाची साथ रोखण्यासाठी अफगाणी जनतेकरीता भारताने सुमारे पाच लाख कोव्हॅक्सिन लसींचे डोस पुरविले आहेत. याबरोबरच सुमारे 13 टन इतकी औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही भारताने अफगाणिस्तानला केला होता. या सहाय्यासाठी तालिबानच्या राजवटीने भारताचे आभार मानले होते. अत्यंत खडतर काळात भारताने अफगाणिस्तानला केलेल्या या सहाय्याचा फार मोठा प्रभाव पडला असून तालिबान देखील भारताशी सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेत आहे. मात्र तालिबानच्या राजवटीकडून असलेल्या अपेक्षा भारताने स्पष्टपणे मांडल्या असून इतर देशांच्या सहाय्याने भारत तालिबानला अफगाणिस्तानात सुधारणा घडवून आणण्यासाठी भारताच्या हालचाली सुरू आहेत. दुशांबे येथील सदर परिषदेतही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी या दिशेने प्रयत्न केल्याचे समोर येत आहे.

leave a reply