पाश्चिमात्यांकडून रशियन जगताविरोधात सर्वंकष युद्धाची घोषणा

- परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह

सर्वंकष युद्धाची घोषणामॉस्को – पाश्चिमात्य देशांनी रशियन जगताविरोधात सर्वंकष युद्धाची घोषणा केली आहे आणि ही बाब आता कोणी लपवूनदेखील ठेवत नाही, असा आरोप रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी केला. जगातील कोणतीही प्रक्रिया अथवा बाब ज्यात पाश्चात्य देशांचा सहभाग किंवा नियंत्रण नाही ती त्यांच्यासाठी विरोधात जाणारी गोष्ट ठरते, असा ठपकाही त्यांनी ठेवला. पाश्चिमात्य देशांना त्यांच्या वर्चस्वाबाबत गैरसमज झाले असून जगावर वर्चस्व ठेवण्याची सवय त्यांनी आता सोडून द्यायला हवी, असा इशाराही रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

रशियाने फेब्रुवारी महिन्यात युक्रेनमध्ये सुरू केलेल्या लष्करी मोहिमेनंतर पाश्चिमात्य देशांनी रशियाविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. रशियावर मोठ्या प्रमाणात आर्थिक व व्यापारी निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचवेळी रशियन खेळाडू, रशियन कलाकार व रशियन उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर विरोधाचा सामना करणे भाग पडत आहे. रशियाचे मित्र तसेच सहकारी असलेल्या देशांवरही दडपण आणून रशियाबरोबरील संबंध तोडण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत आहे.

रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी सर्वंकष युद्धाचा उल्लेख करण्यामागे हा संदर्भ असल्याचे सांगण्यात येते. पाश्चिमात्य देशांना ‘रुसोफोबिया’ झाल्याचा आरोप करून त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी केला. रशियाशी निगडीत प्रत्येक गोष्टीला ‘कॅन्सल कल्चर’च्या माध्यमातून लक्ष्य करण्यात येत आहे व ही बाब आता हास्यास्पद पातळीवर पोहोचल्याची जाणीवही त्यांनी करून दिली. अमेरिका व मित्रदेशांचा रशियाबाबतचा दृष्टिकोन काय आहे, याबद्दल आता कोणीही संभ्रमात राहण्याची गरज नाही, असा टोलाही लॅव्हरोव्ह यांनी लगावला.

दरम्यान, रशियावर निर्बंध लादणारे पाश्चिमात्य देश जगाचे पोलीस असल्याप्रमाणे वागत असून त्यांना कधीच यश मिळणार नाही, असा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला. इतरांना शिक्षा करणाऱ्या पाश्चिमात्य देशांना त्यांच्या सामर्थ्याबद्दल गैरसमज झाल्याकडेही पुतिन यांनी यावेळी लक्ष वेधले.

leave a reply